"मोदींच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्र्यांना बोलू न देणं हा महाराष्ट्राचा जाणीवपूर्वक अपमान"
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 05:27 PM2022-06-14T17:27:45+5:302022-06-14T17:32:21+5:30
या कार्यक्रमातून अनेक प्रश्न निर्माण झाल्याचे राष्ट्रवादीचे मत
Pm Modi Ajit Pawar | श्री संत तुकाराम यांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर होते. त्यांचे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी लोहगाव विमानतळावर स्वागत केले. त्यासोबतच, नरेंद्र मोदींसोबत या लोकार्पण कार्यक्रमासाठी व्यासपीठावरही अजित पवार उपस्थित होते. परंतु, या कार्यक्रमात अजित पवार यांना बोलण्याचा मान दिला नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नाराजी व्यक्त केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांच्या आधी दोन शब्द बोलण्यास सांगण्यात आले, मग महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना का बोलू दिलं नाही?, असा सवाल राष्ट्रवादीचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला. तसेच, पंतप्रधानांच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलू न देणे हा भाजपने केलेला महाराष्ट्राचा अपमान आहे
"पंतप्रधान मोदी यांच्या देहू येथील कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना बोलू दिलं नाही, हा भाजपाने महाराष्ट्राचा जाणीवपूर्वक अपमान केल्याचा संशय आमच्या मनात आहे. अजित पवार यांना शेतकरी, कष्टकरी यांच्याप्रमाणेच वारकऱ्यांच्या प्रश्नांचीही माहिती आहे. पुणे जिल्हा हा पवार कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जातो. तरीही पुणे जिल्ह्यात होत असलेल्या इतक्या भव्य कार्यक्रमात पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना का बोलू दिले नाही असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस विचारत आहे. महाराष्ट्राला कमी लेखण्याचा हा प्रयत्न जाणूनबुजून करण्यात आला का असे अनेक प्रश्न आता निर्माण झाले आहेत", असं रोखठोक मत महेश तपासे यांनी व्यक्त केले.