कर्जत : सध्या राजकारणात मोठे बदल होत आहेत. त्यामुळे २०१९ हे वर्षे शरद पवारांचे असेल, असा विश्वास व्यक्त करत कदाचित त्यांना पंतप्रधानपदाची संधीही मिळू शकते, असा सूचक दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी येथे केला.कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची दोन दिवसांची चिंतन बैठक सुरू आहे. पक्षाचे ध्येयधोरण आणि आगामी वाटचालीचा ऊहापोह माजी मंत्री पटेल यांनी केला. देशाच्या राजकारणात शरद पवार या नावाचा दबदबा आहे. पंतप्रधानही त्यांच्या शब्दाला मान देतात. मात्र सध्या राष्ट्रवादीला बदनाम करण्याचे प्रयत्न अनेकांकडून सुरू आहेत. अशा लोकांबद्दल पवारसाहेब सौम्य भूमिका घेतात. हा सौम्यपणा सोडून त्यांनी आक्रमक भूमिका घ्यावी, अशी विनंती पटेल यांनी केली.काँग्रेसबरोबर आपले शत्रुत्व नाही; पण सध्या हे संबंध ‘कभी खुशी...कभी गम’ असे आहेत. आपल्याला खुल्या मनाने काम करावे लागेल. २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र लढली असती तर १२५ ते १४० जागांवर विजय मिळाला असता. विधानसभा-लोकसभा निवडणूक एकत्र येऊ शकतात, पक्षाचा ठोस कार्यक्रम ठरला पाहिजे आणि त्यानुसार कामही झाले पाहिजे, असे खडे बोलही पटेल यांनी सुनावले. सत्ताधारी केवळ योजनांच्या घोषणा करीत आहेत, मात्र त्या कधी पूर्ण होतील, याबाबत कधी २०२२ तर कधी २०२४ अशी आश्वासने दिली जात आहेत. मात्र आता जनतेला खरे काय आणि खोटे काय ते कळले आहे, त्यामुळे देशातील वातावरण बदलत आहे आणि त्यानुसार पक्षाने आपल्या कार्याची दिशा ठरवावी, यासाठी ही चिंतन बैठक असल्याचे पटेल यांनी नमूद केले.कर्जत तालुक्यातील खांडपे येथील ‘रॅडिसन ब्लू’मध्ये महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवसांच्या चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.चिंतन बैठकीत डॉ. पद्मसिंह पाटील, खासदार विजयसिंह मोहिते पाटील, विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरु ण गुजराथी, दिलीप वळसे पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, महाराष्ट्र प्रदेश महिला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष चित्रा वाघ, खासदार सुप्रिया सुळे, माजी प्रदेश अध्यक्ष भास्कर जाधव, माजी अर्थमंत्री जयंत पाटील, सचिन अहीर आदी उपस्थित होते.स्थानिक आमदार सुरेश लाड यांनी राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे पुष्पगुच्छ व चांदीची गणेशमूर्ती भेट देऊन स्वागत केले. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रास्ताविक केले. देशातील दुसरी कृषी क्र ांती शरद पवार यांनी केली. त्यामुळे आता आयातीऐवजी मोठ्या प्रमाणात निर्यात होत आहे.यामध्ये पवार साहेबांचे योगदान मोठे आहे. कधीही निवडणुका येवोत, आम्ही तयार आहोत, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन बैठकीप्रसंगी ध्वजारोहण करताना राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, सोबत ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आदी.बैठकीत अर्थतज्ज्ञ सी. ए. अजित जोशी यांनी ‘देशासमोरील आणि राज्यासमोरील आर्थिक आव्हाने आणि त्याचे परिणाम’ या विषयावर व्याख्यान दिले. बैठकीला माजी मंत्री गणेश नाईक, आ. शशिकांत शिंदे, आ.अनिल तटकरे, आ. आनंद परांजपे, संजीव नाईक, जिल्हा परिषद अध्यक्ष अदिती तटकरे, मुंबई शहर युवती सेलच्या अध्यक्षा अदिती नलावडे आदी उपस्थित होते.
शरद पवार होऊ शकतात पुढचे पंतप्रधान - प्रफुल्ल पटेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2017 5:50 AM