मुंबई - आणखी दोन वर्षांनी 2019 साली लोकसभेची निवडणूक होणार आहे. ते वर्ष आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लाभदायक ठरेल. त्यावर्षी शरद पवार देशाचे पंतप्रधान होऊ शकतात असं महत्वपूर्ण विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केलं आहे. ते रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये चिंतन बैठकीत बोलत होते.
देशाच्या राजकारणात आजही शरद पवार या नावाचा दबदबा असून, त्यांच्या शब्दाला वजन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही सभागृहात पवार साहेबांना मान देतात असे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे. आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीवरुनही त्यांनी भाजपावर जोरदार टीका केली. टि्वटरवरुन त्यांनी भाजपावर हल्लाबोल केला.
गुजरातमध्ये सत्ताधारी भाजपाची स्थिती बिकट असून पंतप्रधान व अमित शहांना गल्लोगल्ली सभा घेण्याची वेळ आलेली आहे. ही परिस्थिती लज्जास्पद आहे अशी टीका पटेल यांनी केली. ज्या गुजरातचा विकास दाखवून मोदी पंतप्रधान झाले त्या गुजरातमध्ये शेतकरी आज हवालदिल झाला आहे असे टि्वट पटेल यांनी केले आहे. गुजरातमध्ये आम्ही काँग्रेससोबत आघाडी करायला तयार आहोत. वेगळ लढण्यामध्ये नुकसान दोघाचं आहे असे पटेल यांचे मत आहे.