पुणे - विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आठवडा उलटला तरीही राज्यात सरकार स्थापन झाले नाही. त्यावरून विरोधकांनी महायुतीवर निशाणा साधला आहे. इतकं स्पष्ट बहुमत असताना या राज्यात सरकार बनत नाही. आजच वाचलं आता ५ डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. याचा अर्थ लोकांचे बहुमत याला काही महत्त्व नाही. जे काही चाललंय ते राज्यासाठी अशोभनीय आहे असं सांगत शरद पवारांनी टीका केली त्याचसोबत ईव्हीएमवरूनही शंका उपस्थित केली आहे.
पुणे येथे बाबा आढाव यांच्या आंदोलनस्थळी शरद पवारांनी भेट दिली, गेल्या ३ दिवसांपासून ईव्हीएमविरोधात बाबा आढाव आंदोलनाला बसले आहेत. आढाव यांच्या भेटीनंतर शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, महाराष्ट्रात निवडणुकीच्या निकालानंतर जी अस्वस्थता आहे त्यातून बाबा आढाव हे आत्मक्लेश आंदोलन करतायेत. ज्या निवडणुका झाल्या त्यात सत्तेचा गैरवापर आणि पैशाचा महापूर यापूर्वी कधीही बघितल्या नव्हत्या अशा चर्चा लोकांमध्ये आहे. राज्याच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैसा आणि सत्तेचा गैरवापर करून संपूर्ण निवडणूक यंत्रणा हाताशी घेतली गेली ते चित्र महाराष्ट्रात बघायला मिळाले त्याचा परिणाम लोकांची अस्वस्थता वाढली. संसदेबाहेर जे भेटले त्या सगळ्यांना जयप्रकाश नारायण यांची आठवण झाली. आज धोरणात्मक पाऊल टाकण्याची गरज आहे. बाबा आढाव यांनी पुढाकार घेतला, आज ते महात्मा फुले यांच्याशी संबंधित वास्तूमध्ये आत्मक्लेश आंदोलनाला बसले आहेत. बाबांच्या या आंदोलनानं सामान्यांना एकप्रकारे दिलासा मिळतोय. बाबा आढाव यांनी एकट्यानेच ही भूमिका घेणे हे सोयीचं नाही, शेवटी जनतेचा उठावच या सगळ्या प्रश्नांची लढाई लढेल असं त्यांनी म्हटलं.
त्याशिवाय संसदीय लोकशाही उद्ध्वस्त होण्याचे चित्र आज देशात आहे. त्यात देशाची सूत्रे ज्यांच्या हाती आहेत त्यांना याचं काहीही पडले नाही. इतकी चर्चा देशात आहे. संसदेत हा प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न दोन्ही सभागृहात विरोधकांनी केला तर त्यांना बोलू दिले जात नाही. ६ दिवसांच्या अधिवेशनात रोज सकाळी ११ वाजता दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते हा मुद्दा मांडायला आम्हाला परवानगी द्या एवढी मागणी करतात पण ६ दिवसात एकदाही मंजूर झाली नाही. संसदेत देशाच्या कुठल्याही प्रश्नांची चर्चा होऊ शकली नाही. याचा अर्थ संपूर्ण संसदीय लोकशाही पद्धती यावरच राज्यकर्त्यांचा आघात आहे. लोकांमध्ये जावे लागेल, लोकांना जागरूक करावे लागेल. उठाव करायला हवा. आज त्याची आवश्यकता आहे. बाबांच्या आंदोलनामुळे हे आज ना उद्या उठाव झाल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही शरद पवारांनी दिला.
दरम्यान, सत्तेचा गैरवापर आणि बड्या लोकांना संरक्षण या दोन्ही गोष्टी दिसतात. माझ्याकडे आता पुरावा नाही, काही लोकांनी निदर्शनास आणून दिले आहे. काहींनी प्रेझेंटेशन दाखवले, आम्ही त्यांच्यावर फार विश्वास ठेवला नाही कारण आम्हाला वाटत होते, निवडणूक आयोग इतकी चुकीची भूमिका घेईल वाटले नाही. निवडणूक आयोगावर आम्ही संशय व्यक्त केला नाही. परंतु निवडणुकीनंतर यात तथ्य आहे हे दिसून येते. फेर मतमोजणीत काही समोर येईल वाटत नाही. मतदानाच्या शेवटच्या २ तासांमधील जी आकडेवारी समोर येत आहे ती धक्कादायक आहे. बाळासाहेब थोरातांसह अनेकांनी अशी माहिती समोर आणली आहे. त्याचा विचार करावा लागेल. इंडिया आघाडीने एकत्रितपणे हा विषय चर्चेत घ्यावा अशी चर्चा आहे. सोमवारी किंवा मंगळवारी याबाबत निर्णय होईल अशी माहिती शरद पवारांनी दिली.