मुंबई : नागरिकत्व सुधारणा कायदा व एनआरसीबाबत मुस्लीम समाजात असलेल्या प्रचंड असंतोषाच्या पार्श्वभूमीवर मुस्लीम समाजाच्या धार्मिक नेत्यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली व त्यांच्यासोबत या विषयावर चर्चा केली. धार्मिक आधारावर तयार करण्यात आलेल्या व संविधानाला धक्का पोहोचविणाऱ्या या कायद्याला विरोध करण्यासाठी पवारांनी सर्व पक्षांना एकत्र करून लढा उभारण्याची मागणी करणारे निवेदन देण्यात आले. धार्मिक आधारावर देशातील नागरिकांमध्ये भेदभाव करणाऱ्या केंद्र सरकारला असे कृत्य करण्यापासून रोखण्यासाठी पवारांनी मदत करण्याची मागणी करण्यात आली.हजरत मौलाना मोईनुद्दीन अश्रफ यांच्या नेतृत्वाखाली रझा अकादमीचे प्रमुख मौलाना सईद नुरी व इतर मौलानांनी पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांनी एनआरसी महाराष्ट्रात लागू होणार नाही व नागरिकत्व सुधारणा कायदा केवळ मुस्लीम समाजासोबत भेदभाव करणाराच नव्हे, तर त्याचा फटका मोठ्या प्रमाणात हिंदू समाजालादेखील बसण्याची भीती असल्याचे मत शिष्टमंडळाकडे व्यक्त केल्याची माहिती मौलाना नुरी यांनी दिली. भाजप सरकार पाकिस्तान, अफगाणिस्तान व बांगलादेशचे नाव घेऊन मुस्लीम समाजाला जाणीवपूर्वक लक्ष्य करत आहे. प्रत्यक्षात इतर शेजारी देशांमधूनदेखील भारतात नागरिक येतात, असे ते म्हणाले. महाराष्ट्र सरकार हे राज्यातील सर्व जाती-धर्मांच्या नागरिकांचे रक्षण व कल्याण करण्यासाठी कटिबध्द असून, देशातील इतर राज्यांसमोर महाराष्ट्र आदर्श तयार करेल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केल्याचे मौलाना नुरी म्हणाले.
सीएए व एनआरसीविरोधात मुस्लीम धार्मिक नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 5:27 AM