मुलीला पुढे आणण्यासाठी शरद पवारांनी नेत्यांना बाजूला केलं असावं; काँग्रेस नेत्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2023 02:57 PM2023-07-06T14:57:59+5:302023-07-06T14:58:45+5:30
शिंदे गटाचे ४०-५० आमदार आहेत त्यातील काहीच मंत्री बनलेत. १६ आमदार अपात्र झाले तर नवीन मुख्यमंत्र्यांची आवश्यकता असेल. अजित पवार हे मुख्यमंत्री बनतील असं आश्वासन भाजपाने दिले असावे असंही काँग्रेसने म्हटलं.
मुंबई – इतक्या वर्षापासून राष्ट्रवादीत धुसफुस सुरू होती. पक्ष चालवताना शरद पवारांच्या काही चुका झाल्या असतील. कौटुंबिक वादावर बोलणे योग्य होणार नाही. परंतु कौटुंबिक वाद असून त्याचा राज्याच्या राजकारणावर परिणाम होतोय. राष्ट्रवादीतील फूट वैयक्तिक पातळीवर झालीय हे खरे आहे. मुलीला पुढे आणण्यासाठी कदाचित नेत्यांना बाजूला केले असावे. हा त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे असा दावा काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, आरोप-प्रत्यारोप होत असतात. प्रफुल पटेल यांनी धमकी दिलीय, त्यांनी आत्मचरित्र लिहिलं की अनेक गोष्टी बाहेर पडतील. ज्या नेत्यांना शरद पवारांनी पुढे आणले ते आता आरोप करतायेत. महाविकास आघाडीवर या फुटीचा परिणाम झालाय. अजित पवारांसोबत जे आमदार गेले ते आमच्यासोबत होते आता तेविरोधात गेले. ४-५ मतदारसंघात त्याचा फटका बसेल. ज्याप्रकारे शिवसेनेत विभाजनानंतर नेते एकनाथ शिंदेंसोबत गेले परंतु कार्यकर्ते उद्धव ठाकरेंसोबत होते. तसेच शरद पवारांच्या बाबतीत झाले. नेते गेले पण कार्यकर्ते शरद पवारांसोबत आहेत असं त्यांनी म्हटलं.
तसेच शिंदे गटाचे ४०-५० आमदार आहेत त्यातील काहीच मंत्री बनलेत. १६ आमदार अपात्र झाले तर नवीन मुख्यमंत्र्यांची आवश्यकता असेल. अजित पवार हे मुख्यमंत्री बनतील असं आश्वासन भाजपाने दिले असावे. भाजपा, शिवसेना आमदारांमध्ये खूप नाराजी आहे. ९ राष्ट्रवादीचे आमदार बनलेत. त्यामुळे त्या जागा कमी झाल्या. बाकी जागा तिघांमध्ये वाटाव्या लागतील. राज्यातील अनिश्चिता बनली आहे. राज्यासमोर अनेक प्रश्न आहेत. पाऊस झाला नाही, पेरणी झाली नाही. त्यात सरकारमध्ये नाराजी खूप आहे. सरकारकडे बहुमत पण आनंदी कोणच नाही असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं.
दरम्यान, २०१९ मध्ये महाविकास आघाडी राज्यात बनली होती. मतदानाची आकडेवारी पाहिली तर हे आकडे जोडले तर महाविकास आघाडी ही भाजपा-शिवसेनेपेक्षा ८-१० टक्के अधिक आहे. ४८ पैकी ४२ जागा मागच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेनेला मिळाल्या होत्या. महाविकास आघाडी मजबूत असतील तर भाजपा एकेरी आकड्यात आली असती. ८ ते १० जागा भाजपा जिंकल्या असत्या. त्यामुळे मविआ कमकुवत करणे भाजपाचे काम होते असा आरोप काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.