मुंबई – एसटीचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण व्हावं या मागणीसाठी गेल्या ४ महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. यातच काही संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी धडक दिली. यावेळी काहींनी पवारांच्या घरावर चप्पला आणि दगडं फेकल्याचं समोर आलं. या हल्ल्यानंतर पोलिसांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक केली. सदावर्तेसह १०५ कर्मचाऱ्यांनाही अटक करण्यात आली.
मात्र सदावर्ते यांच्या प्रकरणातील कोर्टाच्या सुनावणीत सरकारी वकिलांनी नागपूरहून आलेल्या कॉलचा उल्लेख केला होता. या व्यक्तीचं नाव सांगू शकत नाही असं कोर्टात म्हटलं. मात्र आता या प्रकरणात नागपूर कनेक्शन उघड झालं आहे. मुंबई पोलिसांनी नागपूरच्या त्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. संदीप गोडबोले असं या संशयित आरोपीचं नाव असून तो एसटीमध्ये यांत्रिक पदावर कार्यरत आहे. पवारांच्या घरावर हल्ला झाला तेव्हा गोडबोले सदावर्तेंच्या संपर्कात होते असा दावा केला जात आहे. आता मुंबईत पोलिसांनी चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेतले आहे.
काय आहे नागपूर कनेक्शन?
सरकारी वकील प्रदीप घरत यांनी कोर्टात सांगितले होते की, पवारांच्या घरावर हल्ला करणारे आंदोलन हे सदावर्तेंच्या संपर्कात होते. हल्ल्यापूर्वी ४ जणांनी घराची रेकी केली होती. या चौघांना अटक करण्यात आली आहे. गुणरत्न सदावर्ते तपासात सहकार्य करत नाहीत. सर्व अटक आरोपींचे मोबाईल जप्त केले त्यातून महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत. हल्ल्यापूर्वी एक बैठक झाली होती. अभिषेक पाटील नावाचा एक कर्मचारी सदावर्तेंच्या संपर्कात होता. त्यानेच काही पत्रकारांना तिथे बोलावले.
इतकेच नाही तर एका मराठी न्यूज चॅनेलचा चंद्रकांत सूर्यवंशी नावाचा पत्रकार सदावर्तेंच्या संपर्कात होता. त्याने काही व्हिडीओ डिलीट केले. या पत्रकाराचे आणि सदावर्तेंचे सकाळी साडेदहापासून चॅटिंग सुरू होते. या दोघांत व्हॉट्सअप कॉल झाला. त्यातील एक कॉल नागपूरहून करण्यात आला होता. त्या व्यक्तीचे नाव आम्ही कोर्टात सांगू शकत नाही असं सांगत सरकारी प्रदीप घरत यांनी कोर्टात सदावर्तेंविरोधात आरोप केले. घटनेच्या दिवशी सकाळी नागपूरहून व्हॉट्सअप कॉल आला आणि त्या कॉलनंतर पत्रकार पाठवाचा मेसेज आला. दुपारी २.४२ मिनिटांनी काही पत्रकारांना कॉल गेला. हा सुनियोजित कट होता असं सरकारी वकीलांनी सांगितले होते.