मुंबई : राज्य सहकारी बँकेतील कथित आर्थिक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह बँकेच्या तत्कालीन संचालकांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून वातावरण तापले आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी भाजप सरकारने सूडबुद्धीने ही कारवाई केली, असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. मात्र, यातच भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सुद्धा शरद पवार यांची पाठराखण केली आहे.
एकनाथ खडसे म्हणाले, "मी विरोधी पक्षनेता असल्यापासून विधानसभेत राज्य सहकारी बँकेतील गैरव्यवहाराचा पाठपुरावा केला आहे. या गैरव्यवहारात सुरुवातीपासून कुठेही शरद पवार यांचे नाव नव्हते. त्यामुळे आता अचानक या प्रकरणात त्यांचे नाव कसे काय समोर आले" असे म्हणत एकनाथ खडसे यांनी शंका व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील 25 हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून एमआरए पोलीस ठाण्यात हायकोर्टाच्या आदेशानुसार अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांवर काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर आता ईडीने सुद्धा या प्रकरणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, अजित पवारांसह ७० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य आहे. आम्हाला दिल्लीसमोर झुकणे माहिती नाही, अशा शब्दांत शरद पवार यांनी ईडीकडून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, आम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे, 27 सप्टेंबर रोजी दुपारी 2.00 वाजता ईडी कार्यालयात हजर होणार असल्याचे शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले. ऐन निवडणुकीच्या तोंडावरच कारवाई कशी? असे म्हणत शरद पवार यांनी सरकार आणि भाजपावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.