NCP Jayant Patil ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात महाविकास आघाडीला खिळखिळी करत जास्तीत जागा मिळवण्यासाठी भाजपकडून प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतरही महाविकास आघाडीतील अन्य नेत्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपकडून व्यूहरचना आखली जात असल्याचं दिसत आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा पश्चिम महाराष्ट्रातील एक बडा नेता भाजपच्या दिल्लीतील नेत्यांच्या संपर्कात असून लवकरच पक्षांतर करणार असल्याची कुजबूज राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. या चर्चेचा रोख राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे होता. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी खुलासा केला आहे.
भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा जयंत पाटलांनी फेटाळून लावल्या आहेत. विरोधकांच्या आघाडीत संभ्रम निर्माण करण्यासाठी अशा चर्चा घडवून जात असल्याचा पलटवार पाटील यांनी केला आहे. याबाबत एका मराठी वृत्तवाहिनीने वृत्त प्रसारित केलं आहे.
जयंत पाटील आणि भाजपसोबत जाण्याच्या चर्चा
मागील वर्षी सत्तेत सहभागी होण्याच्या मुद्द्यावरून अजित पवार यांचे राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्याशी मतभेद झाले. त्यानंतर अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदार आणि नेत्यांसह महायुतीत जाण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादीत उभी फूट पडली. अजित पवार यांच्या बंडावेळीही जयंत पाटील हे शरद पवारांची साथ सोडत सत्तेत सहभागी होतील, असं बोललं जात होतं. मात्र पाटील यांनी आपण ठामपणे शरद पवारांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचं सांगितलं. त्यानंतर जयंत पाटील हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या संघटनाबांधणीसाठी राज्यभर फिरत आहेत. मात्र तरीही पाटील यांच्यासोबत अनेकदा संभ्रमाचं वातावरण निर्माण केलं जात आहे. त्यामुळे लवकरच ते पत्रकार परिषद घेऊन या चर्चांबाबत आपली भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे.