राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार माजिद मेमन यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. याची माहिती त्यांनी एका ट्विटमधून दिली आहे. मेमन यांनी आज तीन ट्विट केली होती. यापैकी तिसरे ट्विट शरद पवारांसोबत शुभेच्छा कायम असतील असे म्हटले आहे.
माझ्या 16 वर्षांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील कारकीर्दीत मला सन्मान आणि अमूल्य मार्गदर्शन केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे मी आभार मानतो. वैयक्तिक कारणास्तव मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्यत्व तात्काळ प्रभावाने सोडत आहे. शरद पवार आणि पक्षाला माझ्या सदैव शुभेच्छा, असे ट्विट मेमन यांनी केले आहे.
मेमन हे २०१४ ते २०२० या काळात राज्यसभेचे खासदार होते. एप्रिल 2019 मध्ये मेमन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कठोर टीका केली होती. 'मला वाटते की पंतप्रधान मोदी हे अशिक्षित आणि रस्त्यावर फिरणाऱ्या माणसांसारखे बोलतात. एवढ्या मोठ्या पदावर ते बसले आहेत, त्यांचे पद हे घटनात्मक पद आहे. त्या संवैधानिक पदावर जो बसतो त्याला रस्त्यावरून निवडले जात नाही, असे ते म्हणाले होते.
परंतू, काही काळापूर्वी मेमन यांनी मोदींची स्तुती केली होती. 'जे गुण पीएम मोदींमध्ये आहेत ते विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये नाहीत. नरेंद्र मोदी जर जनतेची मते जिंकून जगातील सर्वात लोकप्रिय नेते म्हणून दाखवले जात असतील, तर त्यांच्यात काही चांगले गुण किंवा त्यांची चांगली कामे असली पाहिजेत.', असे त्यांनी म्हटले होते. यानंतर यु टर्न घेत मी पंतप्रधान मोदी किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचे समर्थन करत नसल्याचा खुलासा केला होता.