मुंबई- आज महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड घडत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्तीची घोषणा शरद पवार यांनी केली आहे. आज मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटरमध्ये 'लोक माझा सांगती' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांकडून पवारांच्या निर्णयाला तीव्र विरोध होत आहे.
शरद पवारांच्या घोषणेनंतर पक्षाचे अनेक नेते-पदाधिकारी मंचावर गेले आणि शरद पवारांना आपला निर्णय मागे घेण्याची विनंती केली. यावेळी अनेक कार्यकर्ते भावूक झाले, काहींना अश्रू अनावर झाले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी यावेळी तुमच्यामुळे आम्ही आहोत आणि पक्ष आहे, अशी भावना व्यक्त केली. आमदार धनंजय मुंडे यांनी तर पवारांचे पायही धरले.
यावेळी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल म्हणाले की, पवार साहेबांच्या निर्णयामुळे आपल्या सगळ्यांच्या भावना अतिशय ज्वलंत झाल्या आहेत. तुम्ही जसे स्तब्ध झाला, तसेच आम्हीदेखील आहोत. साहेबांनी कुणालाही विश्वासात न घेता हा निर्णय घेतला आहे. तुमच्यासारखीच भावना आमचीही आहे. तुमच्या वतीने आम्हीही साहेबांना हात जोडून हा निर्णय मागे घेण्याची विनंती केली आहे.
पवार साहेब आता लगेच काही बोलायला तयार नाहीत. पण, मी त्यांना विनंती करतो की, त्यांनी या निर्णयाबाबत फेरविचार करावा. त्यांनी आपल्या सगळ्यांच्या भावनांचा आदर करावा. त्यांची पक्षाला या राज्याला आणि देशाला गरज आहे. साहेब कायम आपले साहेबच आहेत. त्यांच्या विचाराशी आपण तुलना करू शकत नाही. पण, त्यांनी आपल्या निर्णयावर पुन्हा विचार करावा. अशी मी महाराष्ट्र आणि देशातील जनतेच्यावतीने त्यांना विनंती करतो.