शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा एल्गार; शिवनेरी किल्ल्यावरून काढणार 'शिवस्वराज्य यात्रा'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2024 04:37 PM2024-08-07T16:37:00+5:302024-08-07T16:38:09+5:30

महायुती सरकारच्या काळ्या कारनामांचा पर्दाफाश करत या सरकारला सत्तेतून बाहेर खेचण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून राज्यभरात शिवस्वराज्य यात्रेची घोषणा करण्यात आली आहे. 

Sharad Pawar NCP will held Shivswarajya Yatra from Shivneri Fort for upcoming maharashtra assembly election 2024 | शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा एल्गार; शिवनेरी किल्ल्यावरून काढणार 'शिवस्वराज्य यात्रा'

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा एल्गार; शिवनेरी किल्ल्यावरून काढणार 'शिवस्वराज्य यात्रा'

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून राज्यभरात शिवस्वराज्य यात्रा काढण्यात येणार आहे. येत्या ९ ऑगस्टपासून शिवनेरी किल्ल्यावरून या यात्रेची सुरुवात होईल. यात्रेच्या माध्यमातून महायुती सरकारच्या काळातील कारनाम्यांचा जनतेपुढे पर्दाफाश केला जाईल अशी माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. 

मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत जयंत पाटलांनी महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, महाराष्ट्रात युतीचे सरकार आल्यापासून राज्य अधोगतीकडे गेलेले आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. शेजारचे राज्य आपल्या तरुणांच्या हातचे काम हिसकावून घेत आहेत. हे सर्व सुरू असताना राज्यकर्ते हतबलपणे बसले आहेत. त्यामुळे आम्ही महायुती सरकारचे काळे कारनामे घेऊन जनतेच्या दरबारात जाणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्याचे दर्शन घेऊन यात्रेची सुरूवात करणार आहोत. पहिल्या टप्प्यात दहा दिवसांत ही यात्रा महाराष्ट्रातील ७ जिल्ह्यांतून फिरणार असून लवकरच दुसऱ्या टप्प्याची घोषणा केली जाणार आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच ९ ऑगस्ट हा दिवस निवडण्याचा उद्देश म्हणजे महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली चले जाओ चळवळीचा नारा या दिवशी ऑगस्ट क्रांती मैदानातून देण्यात आला होता. त्यासोबत या दिवशी जागतिक आदिवासी दिवस असल्याचे देखील त्यांनी सांगितले. महाराष्ट्रामध्ये रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या पायवाटेनं आणि आदर्शाने महाराष्ट्र राज्य चालवण्यासाठी राज्यातील जनतेचा आशीर्वाद मागण्यासाठी आम्ही जनतेपर्यंत जाणार आहे. लोकसभा निवडणुकीत जनतेने केंद्र व राज्य सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली. राज्यातील ४८ पैकी ३१ जागांवर महाविकास आघाडीचा विजय झाला. आता महाराष्ट्रातील बहाद्दर जनतेने महायुती सरकारला सत्तेतून बाहेर खेचण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सरकार घाबरून, वेगवेगळ्या योजनांचा भडीमार करत आहे तसेच सरकारी तिजोरी मोकळी करत आहे. सरकार ज्या घोषणा करत आहे ते जनतेलाही पटत नाही असा टोलाही जयंत पाटील यांनी सरकारला लगावला. 

हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा लढा - खासदार अमोल कोल्हे 

हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा लढा आहे. शिवाजी महाराज हे आपले आराध्य दैवत आहेत, त्यांचा आदर्श जागृत करणे ही काळाची गरज आहे. महाराष्ट्रात गद्दारी आणि भ्रष्टाचार यांचे नांगर फिरत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्लीत औरंगजेबाला महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणजे काय हे दाखवून दिले. आज मात्र दिल्लीच्या तख्तासमोर नतमस्तक होण्यासाठी आमच्या नेत्यांना वेश बदलून जावे लागते असा टोला खासदार अमोल कोल्हे यांनी लगावला.

दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिल्लीच्या इशाऱ्यावर काम करणारे आपल्या राज्यातील राज्यकर्ते महाराष्ट्राला काहीही मिळवून देऊ शकले नाही. हा महाराष्ट्रातील शेतकरी आणि तरुणांच्या स्वाभिमानाचा अपमान आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमान दिल्लीच्या अहंकाराविरुद्ध आदराने उभे राहण्याची गरज आहे. ही लढाई एका पक्षाची नाही, ही लढाई महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे असंही अमोल कोल्हे यांनी म्हटलं.
 

Web Title: Sharad Pawar NCP will held Shivswarajya Yatra from Shivneri Fort for upcoming maharashtra assembly election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.