'मी काँग्रेस सोडली, पण गांधी-नेहरूंचे विचार कधीही सोडले नाहीत': शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 01:07 PM2021-12-30T13:07:45+5:302021-12-30T13:08:36+5:30
'मी 1958 साली पुण्यात आलो होतो. मी आणि माझ्यासारखे तरुण गांधी, नेहरू, चव्हाण यांच्या विचारांनी प्रेरित झाले.
पुणे:काँग्रेसशी फारकत घेऊन स्वत:चा पक्ष काढल्यानंतरही महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू आणि यशवंतराव चव्हाण यांचे विचार कधीच सोडले नाहीत, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन करण्यासाठी 1999 पर्यंत वाट पाहिली, याची खंत नाही, असे ते म्हणाले. शरद पवार बुधवारी पुण्यातील एका कार्यक्रमात बोलत होते.
...म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काढला
शरद पवार पुढे म्हणाले, मी 1958 साली पुण्यात आलो होतो. माझ्यासारख्या तरुणांना गांधी, नेहरू, चव्हाण यांच्या विचारसरणीची प्रेरणा मिळाली. त्यांचे विचार आम्ही स्वीकारले आणि त्यावर काम सुरू केले. काँग्रेस हा त्या विचारधारेचा मुख्य आधार होता, त्यामुळे त्यापासून दूर जाण्याचा विचार कधीच केला नाही. काँग्रेसने मला पक्षातून बाहेर केले, त्यामुळे मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन करण्याचा वेगळा निर्णय घ्यावा लागला, असेही पवार म्हणाले.
काँग्रेसला पवारांची गरज ?
ते पुढे म्हणाले की, काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत काही मत व्यक्त केल्याचे त्यांना पचनी पडले नाही, काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली, पण गांधी, नेहरू, चव्हाण यांचे विचार आम्ही कधीच सोडले नाहीत. काँग्रेसला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पवारांची मदत लागेल का? असा प्रश्न विचारला असता, पवार म्हणाले की, आज सर्व समविचारी लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे.