Sharad Pawar ( Marathi News ) : शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर दोन्ही पक्षांतील एक मोठा गट सत्तेत सामील झाल्यामुळे विरोधकांची महाविकास आघाडी कमकुवत झाल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या महायुतीला टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्याकडून महाविकास आघाडीत आणखी मित्रपक्ष जोडण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं दिसत आहे. याचाच एक भाग म्हणून शरद पवार हे मागील काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि रासपचे अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर यांच्या संपर्कात आहेत. महाविकास आघाडीच्या जागावाटपाची बोलणी अंतिम टप्प्यात असताना आता शरद पवार यांच्याकडून या दोन्ही नेत्यांना थेट ऑफर देण्यात आल्याचे समजते.
महाविकास आघाडीच्या कोट्यातून वंचित आघाडीला ४ ते ५ जागा आणि महादेव जानकर यांच्या रासपला शरद पवार हे आपल्या पक्षाच्या कोट्यातून माढ्याची जागा सोडण्यास तयार असल्याची माहिती आहे. हे दोन्ही पक्ष सोबत आल्यास लोकसभा निवडणुकीत सोशल इंजिनिअरिंग साधणं महाविकास आघाडीला शक्य होणार आहे. यादृष्टीनेच शरद पवार यांचा प्रयत्न सुरू असून पुढील काही दिवसांत प्रकाश आंबेडकर आणि महादेव जानकर या दोन्ही नेत्यांसोबत शरद पवार हे याबाबत प्रत्यक्ष भेटीत अंतिम चर्चा करतील, अशी शक्यता आहे.
जानकरांनी काय प्रतिक्रिया दिली?
माढा लोकसभेची जागा सोडण्याची तयारी शरद पवारांकडून दाखवण्यात आल्यानंतर महादेव जानकर यांनी पवार यांच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. माढ्याची जागा सोडण्याची तयारी दाखवल्याबद्दल आम्ही शरद पवार यांचा सन्मान करतो, मात्र आता उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस पक्ष आम्हाला कोणती जागा देणार, हे स्पष्ट करावं, अशी मागणी महादेव जानकर यांनी केली आहे.
दरम्यान, महादेव जानकर हे मागील काही काळापासून भाजपसह महायुतीवर नाराज असल्याचं दिसत आहे. जानकर यांनी अनेकदा भाजपविरोधात वक्तव्य करत आपली नाराजी जाहीरपणे व्यक्तही केली आहे. त्यामुळे जानकर यांना महाविकास आघाडीकडे खेचण्यासाठी शरद पवारांनी पुढाकार घेतला असल्याचे समजते.