Sharad Pawar on Israel-Hamas War: गेल्या काही दिवसांपासून इस्रायल आणि हमास, यांच्यातील युद्ध अत्यंत धोकादायक टप्प्यावर पोहोचले आहे. हमासने हल्ल्या केल्यापासून, इस्रायल सातत्याने गाझा पट्ट्यात हमासच्या स्थळांवर बॉम्ब हल्ले करत आहे. या युद्धामुळे भारतात दोन गट पडले असून, काही इस्रायलची बाजू घेत आहेत, तर काहींनी पॅलेस्टाईनला पाठिंबा दिला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पॅलेस्टाईनला समर्थन देणारे वक्तव्य केल्यानंतर भाजपने त्यांच्यावर जोरदार टीका केली. या टीकेला आता शरद पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे.
शरद पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X(पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करण्यासोबतच टीका करणाऱ्या भाजप नेत्यांना टोला लगावला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी पीएम मोदींचे ट्विट कोट केले आहे, ज्यात मोंनी गाझामधील हॉस्पिटलवर हल्ला झाल्यानंतर पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्षांसोबत फोनवर चर्चा केल्याचे आणि मानवतावादी मदत करणार असल्याचे सांगितले होते.
यासोबतच पुढे लिहिले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ह्या विधानापूर्वी जवाहरलाल नेहरुंपासून अटलबिजारी वाजपेयीपर्यंतच्या पंतप्रधानांनी व्यक्त केलेल्या भूमिकेशी सुसंगत विचार मी व्यक्त केले होते. इस्रायली आणि पॅलेस्टिनी लोक राहत असलेल्या भागातील दीर्घकालीन वादावर तोडगा निघून शांतता आणि सौहार्द प्रस्थापित व्हावे हेच त्यातून सांगायचे होते. मोदीजींनी तेच आधोरेखित केले, त्याबद्दल धन्यवाद."
"मला आशा आहे की, माझ्या विधानाचा विपर्यास करणाऱ्या काही भाजप नेत्यांना अशा संवेदनशील विषयांवर राष्ट्राची भूमिका ध्यानात येईल. राजापेक्षा अधिक निष्ठावंत, अशी इंग्रजी म्हण प्रचलित आहे. ह्या टिपण्या त्याच धांदलीचा एक भाग आहेत," असा जोरदार टोला शरद पवार यांनी या पोस्टमधून लगावला आहे.