सोलापूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत, असे विधान भाजपा नेते गोपिचंद पडळकर यांनी केलेल्या विधानामुळे राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. दरम्यान, माजी मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडळकरांच्या या विधानावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
पडळकर यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ''राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आमचे राजकीय विरोधक आहेत शत्रू नाहीत. त्यामुळे अशा प्रकारची टीका करणे योग्य नाही. याबाबत मी गोपिचंद पडळकर यांच्याशी बोललो आहे. भावनेच्या भारात आपण हे विधान केल्याचे पडळकर यांनी मान्य केले आहे. याबाबत ते लवकरच स्पष्टीकरण देतील.''
धनगर समाजाच्या आरक्षणावरून ठाकरे सरकार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांची जीभ घसरली होती. शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत असल्याचे वादग्रस्त विधान गोपीचंद पडळकर यांनी केले होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते महाराष्ट्राचं नेतृत्त्व करत आहेत. या काळात राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे, अशा शब्दांत पडळकर यांनी पवार यांना लक्ष्य केले होते.
मात्र गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांबाबात केलेले विधान भाजपाचे अधिकृत विधान नसल्याचे स्पष्ट करत भाजपाने या विधानापासून पक्षाला वेगळे केले होते. भाजपाचे नेते अतुल भातखळकर गोपीचंद पडळकरांच्या विधानावर म्हणाले की, भाजपा गोपीचंद पडकरांच्या वक्तव्याशी पूर्णपणे असहमत आहे. शरद पवारांशी वैचारिक मतभेद असले तरी या भाषेत टीका करणं चुकीचं आहे. तसेच पडळकरांच्या वक्तव्याशी भाजपाचा काहीही संबंध नाही, असं अतुल भातखळकर यांनी स्पष्ट केले.
विधान परिषदचे विरोधी पक्षनेते आणि भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी देखील शरद पवारांवरील वादग्रस्त विधानावर गोपीचंद पडळकरांची शाळा घेतली आहे. गोपीनाथ पडकरांनी केलेलं वक्तव्य भाजपाचं अधिकृत विधान नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा शरद पवार असो, अशा पद्धतीने टीका करणं चुकीचं आहे, असं प्रवीण दरेकर यांनी यावेळी सांगितले.
इतर महत्त्वाच्या बातम्या