राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी पक्षाचे अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केल्याने राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. शरद पवार यांनी पद सोडू नये यासाठी कार्यकर्ते भावूक झाले आहेत. तर पक्षातील सहकारी आणि नेतेही शरद पवार यांना पद न सोडण्याबाबत आग्रह करत आहेत. मात्र तरीही शरद पवार हे आपल्या निर्णयावर ठाम असल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे.
शरद पवार यांची निवृत्तीची घोषणा आणि पक्षातील घडामोडींबाबत प्रसारमाध्यमांनां माहिती देताना जयंत पाटील यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय नुकताच जाहीर केला होता आणि ते आपल्या निर्णयापासून ढळलेले नाहीत. त्यांची ही भूमिका अद्यापही कायम आहे. मात्र महाराष्ट्रातील विविध कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी संपर्क करून, हा निर्णय घेऊ नये, असा आग्रह केला आहे. देशातील अनेक राज्यांतील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि नेतेही त्यांना हेच सांगत आहेत. मात्र शरद पवार हे आपल्या निर्णयावर ठाम आहेत. मी प्रदेशाध्यक्ष या नात्याने पक्षाच्या कार्यकर्त्याची आणि पदाधिकाऱ्यांची भूमिका शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचवत आहे. तसेच त्यांची भूमिका काय आहे हे सांगण्याचं काम मी केलं आहे. येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत तरी शरद पवार यांनी अध्यक्षपद सांभाळावे, अशी महाराष्ट्रातल्या असंख्य कार्यकर्त्यांची, तरुणांची भावना आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे, याबबत विचारले असता ते म्हणाले की, सरोज पाटील यांनी अध्यक्षपदासाठी माझं नाव घेतलं असलं तरी मी महाराष्ट्रात काम करतो. महाराष्ट्र सोडून मला दिल्लीची माहिती नाही, माझ्या फारशा ओळखी नाहीत. दुसऱ्या राज्यांशी माझा फारसा संपर्क नाही. त्यामुळे दिल्लीत बसणाऱ्या, लोकसभेत किंवा राज्यसभेत काम करणाऱ्या, संसदेत बसून देश पाहणाऱ्या व्यक्तीने अशा जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत. शरद पवार यांना तो अनुभव आहे. त्यामुळे ते यशस्वीपणे राष्ट्रवादी काँग्रेस वाढवण्याचं काम करू शकले. आज अनेक वर्षांचा पवार यांचा अनुभव असल्याने लोकांची श्रद्धा विश्वास असल्याने अनेक राज्यातील लोक राष्ट्रवादी काँग्रेसशी जोडले गेले आहेत, असे जयंत पाटील म्हणाले.
आज शरद पवार हे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. सर्वच जण असं करणं योग्य नाही असं सांगताहेत. मात्र पक्ष पुढे नेण्यासाठी काही पावलं टाकली पाहिजेत, अशी शरद पवार यांची भूमिका दिसत आहे. मात्र मी प्रदेशाध्यक्ष असल्याने मला आणि माझ्या सहकाऱ्यांना २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची काळजी आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत शरद पवार यांनी अध्यक्षपदावर राहावं, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्यामुळे शरद पवार हे तोपर्यंत अध्यक्ष राहिले तर ते पक्षातील सर्व घटकांना न्याय मिळवून देतील. तसेच ते या पदावर राहिल्यास आम्ही जर कुणावर अन्याय केल्यास कार्यकर्ते त्यांच्याकडे दाद मागू शकतील. न्याय देऊ शकतील, असेही जयंत पाटील म्हणाले.