Sharad Pawar Balasaheb Thackeray: महाराष्ट्राला राजकारणाची समृद्ध अशी परंपरा लाभली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय प्रवासाचा जेव्हा उल्लेख केला जातो, तेव्हा त्यात दोन नावे नेहमी घेतली जातात. त्यातील एक नाव म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार आणि दुसरे म्हणजे शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे. पवार आणि ठाकरे या दोन दिग्गज नेत्यांची घनिष्ठ मैत्री सर्वश्रुत होती. या दोघांनी राजकारणात एकमेकांच्या विरोधात प्रचंड आरोप प्रत्यारोप केले, पण राजकारणाबाहेर वैयक्तिक आयुष्यात ते एकमेकांचा आदर करत असे अनेक किस्से दोघांकडून सांगितले गेले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांशी राजकीय संगनमत केले. महाविकास आघाडीने अडीच वर्षे सत्ता राबवली, त्यावेळी उद्धव ठाकरे अनेक विषयांवर शरद पवारांचे मार्गदर्शन घेतले. त्याच दरम्यान आज बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शरद पवारांनी एक विशेष ट्विट केले.
"शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सामाजिक प्रश्नांवर आपल्या कुंचल्याच्या माध्यमातून भाष्य करणारे एक कुशल व्यंगचित्रकार होते. आपल्या अमोघ वकृत्वाद्वारे मराठी माणसांच्या मनात त्यांनी एक धगधगता स्वाभिमान जागृत केला. मराठी माणसाच्या हितासाठी नेहमीच रोखठोक भूमिका घेणारे शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!", अशा शब्दांत त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी आदरांजली वाहिली.
दरम्यान, आज नाशिकमध्ये ठाकरे गटाचे राज्यव्यापी अधिवेशन आहे. संध्याकाळी ६ वाजता उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करून आणि ध्वजवंदन करून अधिवेशनाला सुरूवात होईल. संध्याकाळी ६ वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे.