Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रमुख शरद पवार(Sharad Pawar) यांनी 'लोकमत' व्हिडिओचे संपादक आशिष जाधव यांना विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी सध्याच्या राज्यातील परिस्थितीवरुन विविध विषयांवर भाष्य केले. मी या काळात अनेक लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय, यामुळे सत्ताधारी असहाय्य झाले आहेत आणि सातत्याने वैयक्तिक हल्ले करत आहेत, पण लोकांवर अशा आरोपांचा परिणाम होत नाही, त्यामुळे चिंता नाही, असं पवार म्हणाले.
EVM बाबत लोकांच्या मनात शंकायावेळी पवारांनी EVM चा मुद्दाही उपस्थित केला. ते म्हणाले, मी अनेक लोकांना भेटतो, त्यांच्या प्रतिक्रिया ऐकतो. अनेकजण मला म्हणतात की, आम्ही तुम्हालाच मतदान करणार आहोत, पण तेवढं ते EVM मशीनचं बघा. या मशीनबाबत लोकांच्या मनात आजही शंका आहे.
यंदा बारामतीवर पवारांचे विशेष लक्ष?कधी नव्हे ते पवारांना बारामतीवर लक्ष घालावे लागत आहे. मुलीसाठी पायाला भिंगरी लावून फिरत आहेत, अशी टीका सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. त्यावर पवार म्हणाले, मी आतापर्यंत बारामतीला एकच सभा घेतली आणि ती म्हणजे प्रचारसभेचे नारळ फोडण्याची सभा. मी अजून सभा घेईल, पण जिथे फार जात नाही, तेथील लोकांचाही आम्हाला पाठिंबा मिळत आहे. अनेक वर्षांपासून ज्या लोकांशी संवाद सुरू आहे, तो आजही आहे. त्यामुळे लोकांची साथ आम्हाला मिळेल, यात दुमत नाही.
विधानसभा क्षेत्रांचे गणित कसे जुळवणार?बारामती लोकसभा मतदारसंघात चार महायुतीचे आणि दोन काँग्रेसचे उमेदवार आहेत. यावर बोलताना पवार म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीत संसदेत कोण भूमिका मांडणार, याचा लोक विचार करतात. लोकसभेच्या निवडणुकीत लोकांची मानसिकता वेगळी असते. सुप्रिया सुळे खासदार म्हणून प्रभावी आहेत. त्यांना तीनवेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. त्यांचे काम देश पातळीवर नावाजलेले आहे.
ही निवडणूक मोदी विरुद्ध राहुल गांधी आहे का?यावेळी पवारांना विचारण्यात आले की, तुम्ही सहावेळा बारामतीतून निवडून आला आहात. पण, आता यंदाची निवडणूक पवार विरुद्ध पवार की, मोदी विरुद्ध राहुल गांधी आहे. यावर शरद पवार म्हणतात, या निवडणुकीचा राहुल गांधींशी काही संबंध नाही. ही गोष्ट खरी आहे की, नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी या निवडणुकीत विशेष लक्ष दिले आहे. अजित पवार आणि त्यांचे सहकारीदेखील कामाला लागले आहेत, तो त्यांचा अधिकार आहे. भाजपचे काही नेते मला सांगतात की, त्यांना वरुन आदेश देण्यात आले आहे की, या निवडणुकीवर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे.