सरकोली : माझ्या वडिलांच्या निधनानंतर माझ्या मतदार संघात लक्ष देण्याची गरज असताना शरद पवार यांनी दुर्लक्ष केले. मला कोणतीही मदत केली नाही असे सांगतानाच भालके यांनी राष्ट्रवादीचे नेते अभिजीत पाटील यांना टोमणा मारला. पोपटपंची करणाऱ्यांना पाठीशी घालून त्यांना माझ्या विरोधात उभे केले. मी आता शांत बसणार नाही. माझी ताकद दाखवणार, अशी टीका माजी आमदार कै. भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांनी केली आहे.
भगीरथ भालके यांनी मंगळवारी दुपारी भारत राष्ट्र समितीमध्ये जाहीर प्रवेश केला. सरकोली येथील शेतकरी मेळाव्यात केसीआर यांच्या उपस्थितीत त्यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला. यावेळी बीआरएस पक्षाचे 32 मंत्री व 87 आमदार उपस्थित होते. भालके यांच्या जाहीर प्रवेश प्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांनी व भालके परिवार समर्थकांनी जोरदार टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून भालके यांना प्रतिसाद दिला.
मेळाव्याला संबोधित करताना तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात परिवर्तनाची गरज असल्याची भावना व्यक्त केली. महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभेत बीआरएस पक्षाचा उमेदवार निवडणूक लढवणार आहे. बीआरएस पक्ष हा शेतकऱ्यांचा पक्ष आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढणारा पक्ष आहे बीआरएस पक्ष सत्तेत आल्यास भगीरथ भालके यांना मंत्रिपद देऊ. पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी त्यांच्यावर सोपवू, असे बोलले.