मुंबई - देशातील मोठ-मोठ्या उद्योगपतींनी बँकेचे थकवलेले पैसे भरणाऱ्या सरकारकडे कष्टकरी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसे नाहीत, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. राज्यात विधानसभा निवडणुकीचे कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर शरद पवार यांनी रविवारी पहिल्यांदाच साताऱ्यात सभा घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
राज्यात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच, सत्ताधारी व विरोधकात आरोप-प्रत्यारोप सुरु झाली आहेत. सातारा येथे रविवारी झालेल्या सभेतून शरद पवार यांनी सत्ताधारी पक्षांवर जोरदार हल्ला चढवला. शेतकऱ्यांची कर्जमाफी, देशातील मंदी, बेरोजगारी अशा अनेक मुद्यावरून त्यांनी भाजपवर टीका केली. तर चुकीच्या लोकांच्या हातात महाराष्ट्र जाऊ देणार नाही, असंही पवार म्हणाले.
मोठ-मोठ्या उद्योगपतींनी शासकीय-खाजगी बँकमधून घेतलेले कर्ज थकवल्याने बँकेंची परिस्थिती बिघडली म्हणून सरकारने त्या बँकेंची परिस्थिती सुधारण्यासाठी 85 हजार कोटी रुपये बँकांना दिले. कर्ज उद्योगपती घेतात आणि पैसे सरकार भरत आहे. मात्र त्याच सरकारकडे कष्टकरी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसे नसल्याचा आरोप पवार यांनी केला. राज्यात अनेक भागात दुष्काळी परिस्थिती असून शेतकरी आत्महत्या करत आहे. असे असूनही हे सरकार फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप सुद्धा पवार यांनी केला.
देशात मंदी आली असून, त्यामुळे लाखो लोकांच्या नोकऱ्या जात आहे. आधीच देशात बेरोजगारिचा प्रश्न असताना, त्यात आता आहे त्या नोकऱ्या जात आहे. देशात अशी परिस्थिती असताना सुद्धा राज्यकर्त्यांना याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नसल्याचा टोला पवार यांनी लगावला. पदवीधर तरुण नोकऱ्यांच्या शोधात फिरत असून त्यांना काम मिळत नाही. अनेक ठिकाणी चालू कारखाने बंद पडत असल्याचे सुद्धा यावेळी पवार म्हणाले.