औरंगाबाद: मनसेप्रमुख राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यांवरून आक्रमक पवित्रा घेतला आहे. भोंगे उतरवण्यासाठी त्यांनी ३ मेपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. त्यानंतर ४ तारखेपासून कोणाचंही ऐकून घेणार नाही. अजिबात गप्प बसणार नाही. भोंगे असलेल्या मशिदींसमोर दुप्पट आवाजात लाऊड स्पीकरवर हनुमान चालिसा लावणारच, असा आक्रमक पवित्रा राज यांनी घेतला आहे. राज यांनी कालच्या सभेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य केलं. मात्र राज यांच्या भाषणात शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा उल्लेखही केला. आता त्यावरून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मोठं विधान केलं आहे.
ईदच्या आधी घाणेरडं राजकारण करण्यासाठी गृह मंत्रालयानं राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेला परवानगी दिली. शिवसेनेला कमकुवत करण्यासाठी शरद पवार राज ठाकरेंना प्रोत्साहन देत असल्याचा दावा जलील यांनी केला आहे. राज यांच्या इशाऱ्यानंतर मुस्लिम समाजानं कोणतीही प्रतिक्रिया देऊ नये. देशात लोकशाही आहे. हुकूमशाही नाही, असं त्यांनी म्हटलं.
गृह मंत्रालय राष्ट्रवादीकडे आहे. त्यांनी या सभेला परवानगी दिली. ईदनंतर सभा घ्या, असं त्यांना सांगता आला असतं. मात्र मनसे मजबूत व्हावी. शिवसेना कमकवुत व्हावी ही पवारांची इच्छा आहे. तसं झाल्यास आता आघाडीतील सर्वात मोठा पक्ष आम्ही आहोत, असा दावा पवार आणि त्यांची गँग करेल, असं जलील म्हणाले.
कोणी धर्म मानतो, कोणी मानत नाही. प्रत्येकाला त्याबद्दलचा अधिकार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला तसा अधिकार दिला आहे. आम्ही किमान महापुरुषांच्या नावानं राजकारण करत नाही. त्यांच्या नावानं दुकान चालवत नाही, असा टोला जलील यांनी राज यांना लगावला.