कोल्हापूर : शिवसेना भाजपाची ही सभा इव्हेंट आहे. येऊन पाहा, तुमच्याकडेही गर्दी नसेल. शरद पवार यांना कधीही भाजपात घेऊ नका. पवारांनी महाराष्ट्राला खड्ड्यात घातले, अशी टीका शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. यापूर्वी कोल्हापुरातील सभेत साताऱ्याचे माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश केला.
कोल्हापुरातून महायुती आणि कराडमधून महाआघाडीच्या प्रचाराचा एकाचवेळी नारळ फुटला आहे. कराडमध्ये महाआघाडीची सभा झाली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह खासदार उदयनराजे उपस्थित होते. तर कोल्हापुरातील महायुतीच्या सभेला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह चंद्रकांत पाटील आदी उपस्थित आहेत. दोन्ही सभांना कार्यकर्त्यांची मोठी गर्दी लोटली आहे.
पश्चिम महाराष्ट्रातून रांगचे रांग खासदार लोकसभेत जाणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सेना-भाजपने युती का केली, याचे उत्तर देण्याची गरज नाही, असेही त्यांनी सांगितले. आम्हाला भाषणही देण्याची गरज नव्हती. मुख्यमंत्र्यांना बोललो की लोकांना केवळ आपल्याला एकत्र पाहायचेय. मोदी नको तर ठेवा बाजुला, पण त्यांच्या 56 जणांना निवडून देणार का, असा सवालही त्यांनी केला. त्यांच्याकडे पंतप्रधान पदाचा उमेदवारही नाही. त्यांचे दोन दावेदार होते. शरद पवार आणि मायावती, दोघांनीही निवडणुकीतून माघार घेतली. शरद पवार यांना दुसरे काही मिऴाले नाही तेव्हा त्यांनी बीसीसीआयची खुर्ची बळकावली. त्यांना खुर्ची लागते, असा आरोप ठाकरे यांनी केला.
राष्ट्रवादीला मत द्यायचे असेल, तर अजित पवार काय करणार होते ते आठवा, असे आवाहन ठाकरे यांनी केले. दुष्काळातही सरकारने कामे केली. मुख्यमंत्री फडणवीसांचा मला अभिमान वाटतो. सदाभाऊ खोत यांची तोफ मला हातकणंगलेमध्ये हवी आहे, अशी स्तुतीही ठाकरे यांनी केली.