लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या जागावाटपाच्या चर्चेला दिल्लीत वेग आला आहे. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शुक्रवारी दिल्लीत आपल्या निवासस्थानी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासोबत महाराष्ट्रातील जागावाटप तसेच निवडणूक रणनीतीविषयी चर्चा केल्याचे समजते.
राहुल-पवार एकाच वाहनातून रवाना ‘इंडिया’ आघाडीच्या दीडशे निलंबित खासदारांचे जंतर-मंतर येथील धरणे आंदोलन संपल्यानंतर शुक्रवारी राहुल गांधी, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासोबत एकाच वाहनातून पवार यांच्या ६, जनपथ या निवासस्थानी पोहोचले. तिथे त्यांनी अर्धा तास चर्चा केली. मविआच्या जागावाटपाची चर्चा महाराष्ट्रात करण्याऐवजी तिन्ही पक्षांच्या श्रेष्ठींनी दिल्लीत करावी, असा प्रस्ताव उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी मांडला आहे.
‘वंचित’वर काँग्रेसचे शिक्कामोर्तब बाकी‘इंडिया’ आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला स्थान देण्याविषयी ठाकरे गट आणि शरद पवार गटामध्ये एकमत झाले असून, त्यावर काँग्रेसला शिक्कामोर्तब करावयाचे आहे. आंबेडकर यांच्या ‘इंडिया’ आघाडीतील समावेशामुळे महाविकास आघाडीला राज्यात बळ मिळेल, अशी मविआच्या नेत्यांची अपेक्षा आहे.