“अरे ती बारामती आहे”; सुनेत्रा पवारांच्या पराभवावरुन शरद पवारांचा अजितदादांना खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 02:35 PM2024-07-17T14:35:19+5:302024-07-17T14:36:20+5:30
Sharad Pawar News: मला खात्री होती की, सुप्रिया सुळेलाच अधिक मतदान होईल, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
Sharad Pawar News: लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे तर महायुतीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा मोठा पराभव झाला. यानंतर सुनेत्रा पवार यांना राज्यसभेतून संसदेवर पाठवण्यात आले. बारामतीतील निवडणुकीकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले होते. यासंदर्भात शरद पवार यांनी भाष्य केले आहे. अरे ती बारामती आहे, असे सांगत अजित पवार यांना खोचक टोला लगावला.
उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांनी विकास कामे केली, असे म्हटले जाते. तरीही सुनेत्रा पवार यांचा लोकसभेला पराभव कसा झाला, अशा आशयाचा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले की, अरे ती बारामती आहे. मतदारसंघातील लोकांशी तुमचा संवाद कसा आहे? त्यावर बऱ्याच गोष्टी ठरतात. मात्र आता तसा संवाद होत नाही, असे शरद पवार यांनी सांगितले.
माझा दोन पिढ्यातील संवाद त्याला कारणीभूत आहे
बारामतीत मला कुणी भेटायला आले, तर मला त्यांच्या वडिलांचे नाव विचारावे लागते. तेव्हा कळते हा कुणाच्या घरातला आहे. दोन पिढीतील हा संवाद कायम ठेवला तर लोक कधीही नेत्याला विसरत नाहीत. त्यामुळे बारामतीत कुणी काहीही म्हटले तरी मला खात्री होती की, सुप्रिया सुळेलाच अधिक मतदान होईल. घरातलाच विरोधी उमेदवार असतानाही सुप्रिया सुळेला ४० हजारांचे लीड दिले. त्याचे कारण माझा दोन पिढ्यातील संवाद कारणीभूत आहे, असे शरद पवार म्हणाले.
दरम्यान, अजित पवार राष्ट्रवादीतून वेगळे झाले असले, तरी ते कुटुंबाचा भाग आहेत. कुटुंब कधी वेगळे होत नाही. पण त्यांना पक्षात पुन्हा यायचे असेल तर मला आधी पक्षाला विचारावे लागेल. कारण फुटीनंतर ज्यांनी संघर्षाचा काळ अनुभवला त्यांचे म्हणणे काय आहे? याला जास्त महत्त्वाचे आहे. तरीही ही जर तरची गोष्ट आहे, असे सूचक विधान शरद पवारांनी केले.