Sharad Pawar on Sridhar Patankar ED Raids: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांच्यावर मंगळवारी दुपारी ईडीकडून कारवाई करण्यात आली. मुख्यमंत्री ठाकरे यांचे मेहुणे असलेले श्रीधर पाटणकर यांची अंदाजे साडेसहा कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली. त्यात ठाण्यातील नीलांबरी प्रकल्पातील ११ फ्लॅट्स (सदनिका) जप्त केल्याची माहिती देण्यात आली आहे. PMLA कायद्यानुसार ईडीने ठाण्यात ही कारवाई केली. या कारवाईनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे नेतेमंडळी यांच्या यावर प्रतिक्रिया आल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील या मुद्द्यावर अतिशय परखड अशी प्रतिक्रिया दिली.
"सध्या देशात या सगळ्या साधनांचा जो गैरवापर होत आहे, तो देशासमोरील मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रसारमाध्यमांकडून देण्यात आलेली आकडेवारी जी खरी असेल तर त्यानुसार हे स्पष्टपणे दिसून येतं की विरोधकांना त्रास देण्यासाठी राजकीय हेतुने हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. हे सुडाचं राजकारण सुरु आहे. कुणाला तरी त्रास देण्यासाठी हे राजकारण होत आहे. केवळ दुसऱ्यांना त्रास देणं या उद्देशाने तपास यंत्रणांना गैरवापर होत आहे. यात काय करता येईल ते पाहूया. पण स्पष्टच सांगायचं झालं तर ५ ते १० वर्षांपूर्वी ईडी ही संस्था नक्की काय आहे, हे बहुतांश लोकांना माहिती नव्हतं. पण आता मात्र ईडी संस्था गावागावात फिरत आहे", असं स्पष्ट मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली. ठाण्यातील ११ सदनिका ईडीकडून सील करण्यात आल्या. ईडीने पुष्पक ग्रुप ऑफ कंपनीवर ही मोठी कारवाई केली. पाच बँकेतील खाती आणि शेअर्सदेखील या कारवाई दरम्यान सील करण्यात आले आहेत. त्यामुळे आता या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांना घेरण्याचा विरोधकांचा प्रयत्न सुरू आहे.