Sharad Pawar News: लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटाचा मोठा धक्का बसला. केवळ एक खासदार निवडून आला. याउलट महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने चांगलीच बाजी मारली. अनेक दिग्गजांना धक्का देत शरद पवार गटाचे उमेदवार निवडून आले. यानंतर आता अजित पवार गटातील अनेक जण पुन्हा एकदा शरद पवार गटात परतण्यास इच्छुक असल्याची चर्चा सुरू आहे. यावर शरद पवार यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्याचे सांगितले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २०२३ मध्ये फूट पडली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असे दोन गट निर्माण झाले. अजित पवार गट सरकारमध्ये सहभागी झाला तर शरद पवार गट विरोधी पक्षात राहिला. यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाने बाजी मारली. तर अजित पवार गटाला एकाच जागेवर समाधान मानावे लागले. यानंतर अजित पवार गटातील अनेक नेते, पदाधिकारी परतण्यास इच्छुक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता.
योगदान आणि भूमिका यावरून निर्णय घेतला जाईल
सरसकट निर्णय घेणे कितपत योग्य आहे? याबाबत सांगता येणार नाही. मात्र, आमच्या पक्षातील जे इतर माझे सहकारी आहेत. त्यांना विश्वासात घेऊन या संदर्भातील निर्णय घेतला जाईल. मात्र, याबाबत स्पष्ट असे विधान करता येणार नाही. त्यामध्ये जे इकडे येण्यास इच्छुक आहेत, त्यांचे योगदान आणि भूमिका यावरून निर्णय घेतला जाईल, अशी सकारात्मक प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.
दरम्यान, भाजपाचे सुजय विखे पाटील यांचा पराभव करत निलेश लंके खासदार झाले. निलेश लंके यांनी इंग्रजीतून शपथ घेतली. यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. मी सरळ सांगितले आहे. कोणत्याही भाषेत बोलता येते. त्यामुळे एखादी जनमानसात काम करणारी व्यक्ती देशपातळीवरील संसदेत जात असेल तिच्या भाषेवरुन प्रश्न उपस्थित करणे हे काही शहाणपणाचे लक्षण नाही. त्याला उत्तर निलेश लंकेंनी दिले याचा आम्हाला आनंद आहे, असे शरद पवार म्हणाले.