Sharad Pawar On Reservation: ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण चांगलेच तापताना दिसत आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलन करणारे लक्ष्मण हाके आणि मनोज जरांगे पाटील आक्रमकपणे भूमिका मांडत असून, आपापल्या मागण्यांवर ठाम आहेत. तसेच एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपही करताना पाहायला मिळत आहेत. शरद पवार यांनी आरक्षणप्रश्नी लक्ष घालावे, अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी केली होती. त्यावर शरद पवार यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली.
शरद पवार यांनी सर्वपक्षीयांची एक बैठक बोलवावी. आमदार-खासदारांची बैठक बोलवावी. सगळ्या जबाबदार लोकांची बैठक बोलवावी. सामाजिक शास्त्रज्ञांची बैठक बोलवावी. इतिहास तज्ज्ञांची बैठक बोलवावी. प्रत्येक विद्यापीठांच्या कुलगुरुंची बैठक बोलवावी. सगळ्या लोकांना एकत्र बसवावे आणि शरद पवार यांना सगळे लोक रिस्पेट करतील. आऊट ऑफ द जाऊन आदर देतील, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले. यावर पत्रकारांशी संवाद साधत असताना शरद पवार यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली.
ओबीसी किंवा मराठा घटक असो...
राज्याचे मुख्यमंत्री सर्वपक्षीय लोकांची बैठक बोलाविण्याच्या विचारात आहेत. ज्याअर्थी त्यांनी पुढाकार घेतला आहे, त्याअर्थी आम्ही कुणीही या विषयात राजकारण आणण्याचा प्रश्न येत नाही. सामंजस्यातून पर्याय काढण्याच्या प्रयत्न होत असेल, तर आमची सरकारला साथ असेल. सामाजिक ऐक्याच्या संबंधी तडजोड नाही. ओबीसी किंवा मराठा घटक असो किंवा अन्य घटक असो त्यांच्यात एकप्रकारची दुही असणे ही राज्याच्या दृष्टीने योग्य नाही. काहीही करायचे, पण आमच्यात एकवाक्यता राहिली पाहिजे, असे शरद पवार म्हणाले.
दरम्यान, पुढचा धमाका होणार आहे. १३ तारखेपर्यंत गप्प आहे. मराठा समाजाला सरकारने फसवू नये. सगेसोयरेची अंमलबजावणी आमच्या म्हणण्याप्रमाणे झाली पाहिजे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही. अंतरवाली सराटी येथे जाऊन बसणार आहे. आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही. ६ जुलैपासून मराठा समाज जनजागृती रॅली जिल्ह्याजिल्ह्यात निघणार आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.