बेनामी मालमत्ता प्रकरणात अजित पवारांना क्लीन चिट; शरद पवार म्हणाले, "निर्णय घेतलेल्यांनी लोकांच्या..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 18:30 IST2024-12-07T18:12:18+5:302024-12-07T18:30:23+5:30
दिल्ली ट्रिब्युनल कोर्टाकडून अजित पवारांना मिळालेल्या क्लीन चिटवर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बेनामी मालमत्ता प्रकरणात अजित पवारांना क्लीन चिट; शरद पवार म्हणाले, "निर्णय घेतलेल्यांनी लोकांच्या..."
Sharad Pawar on Ajit pawar Clean Chit : सहाव्यांदा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर दोन दिवसांनी अजित पवार यांची जप्त केलेली बेनामी मालमत्ता मुक्त करण्याच आदेश आले आहेत. माध्यमांच्या वृत्तानुसार, दिल्लीच्या आयकर विभाग न्यायाधिकरणाने अजित पवार यांची १,००० कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता मुक्त केली आहे. आयकर विभागाने ७ ऑक्टोबर २०२१ रोजी छापा टाकून या मालमत्ता जप्त केल्या होत्या. त्यात अजित यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि मुलगा पार्थ पवार यांचीही मालमत्ता होती. अजित पवारांना हा मोठा दिलासा मिळाल्यानंतर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली.
दिल्लीच्या बेनामी न्यायाधिकरण न्यायालयाने ऑक्टोबर २०२१ मध्ये प्राप्तिकर विभागाच्या ताब्यातून अजित पवारांच्या जप्त केलेल्या मालमत्ता मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या निर्णयानंतर जप्त केलेली मालमत्ता प्राप्तिकर विभागाकडून परत करण्यात येणार आहे. या निर्णयावर शरद पवार यांनी मोजक्या शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. ते कोल्हापुरातून बोलत होते.
अजित पवार यांना मिळालेल्या क्लीन चिटबाबत विचारला असता, "मग त्याचं काय? झालं आता. त्यांचा निकाल लागला आहे. त्याच्यावर काय भाष्य करायचं," अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.
आधी सिंचन घोटाळा आणि आता जप्त केलेल्या मालमत्ता प्रकरणात अजित पवारांना क्लीन चिट मिळाली असं पत्रकाराने म्हटलं. त्यावरही शरद पवारांनी भाष्य केलं. आता ते सोडून ज्यांनी निर्णय घेतले त्यांनी एक लोकांच्या समोर स्वच्छ चित्र मांडावे असं शरद पवार म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी निमंत्रण दिलं होतं ही वस्तुस्थिती - शरद पवार
मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी तु्म्हाला फोन केला होता का प्रश्न देखील यावेळी विचारण्यात आला. त्यावर शरद पवार यांनी हो असं उत्तर दिलं. "शपथविधीला या म्हणून त्यांचा फोन आला होता. मी त्यांना सांगितले की राज्यसभेचं अधिवेशन चालू आहे. त्यामुळे येणे शक्य नाही. पण त्यांनी निमंत्रण दिलं होतं ही वस्तुस्थिती आहे," असं शरद पवार म्हणाले.