"आमच्यातल्या कोणालाही..."; मुख्यमंत्रीपदाबाबत शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 02:55 PM2024-08-23T14:55:22+5:302024-08-23T15:03:15+5:30
मविआच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत महत्त्वाचं विधान केलं आहे.
Sharad Pawar On CM : राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीकडून विधानसभा निवडणुकीच्या तयारीला जोरदार सुरुवात झालीय. तसेच विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करण्यावरुन सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. या मागणीसाठी उद्धव ठाकरे हे जास्त आग्रही असल्याचे पाहायला मिळत आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याची चर्चा थांबवावी अशी मागणी काँग्रेसकडून होतेय. या चर्चेवरुन आता राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांनी मुख्यमंत्री पदाबाबत महत्त्वाचे विधान केलं आहे.
महाविकास आघाडीच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी केली होती. आपण त्या चेहऱ्याला पाठिंबा देऊ असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. पण यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने ठोस उत्तर दिलं नव्हतं. त्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी किमान चार भिंतीच्या आड तरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्यात यावा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाने मांडली आहे. ठाकरे गट मुख्यमंत्री पदाचा चेहरा आधीच जाहीर करावा या मागणीसाठी आग्रही आहे. तिन्ही पक्षांच्या समन्वय समितीने याचा निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात येत असल्याचे म्हटलं जात आहे. याच मुद्द्यावरुन शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केलं आहे.
"माझ्या पक्षातून कुणालाही मुख्यमंत्री होण्यात रस नाही. आमच्याकडून कोणालाही पुढे आणायचं नाही. आम्हाला फक्त महाराष्ट्राच्या सत्तेत परिवर्तन हवंय. सत्तेत परिवर्तन करुन एका विचाराने या राज्यातील जनतेला उत्तम प्रशासन द्यावं ही आम्हा लोकांची इच्छा आहे. त्यामुळे आम्ही कुणीही असणार नाही. माझा तर प्रश्नच नाही. त्यामुळे हा प्रश्न आता उभा करण्याची काही आवश्यकता नाही. आज लोकांना पर्याय हवा आहे तो कसा देता येईल याच्यावर लक्ष्य केंद्रीत करुया," असं शरद पवार म्हणाले.
दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी याआधी मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंच्या नावाबाबात भाष्य केलं होतं. “मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर केल्याशिवाय निवडणुकीला सामोरं जाणं धोक्याचं ठरू शकतं. लोकांनी याआधी उद्धव ठाकरे यांचं काम पाहिलं आहे. ते महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री होते. तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहून मतदान केलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा बनू शकतात,” असं संजय राऊत म्हणाले होते.
त्यानंतर षण्मुखानंद सभागृहात झालेल्या मविआच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी, "मी मुख्यमंत्रीपद सोडलं ते महाराष्ट्रासाठी. मी माझ्यासाठी लढत नसून महाराष्ट्राच्या स्वार्थासाठी लढतो आहे. महाविकास आघाडीने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आताच जाहीर करावा. त्याला माझा पाठिंबा आहे," असं म्हटलं होतं.