"पक्ष चालवणं शक्य नाही म्हणून शरद पवार लोकसभेनंतर..."; फडणवीसांचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 01:09 PM2024-05-08T13:09:20+5:302024-05-08T13:16:48+5:30
Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे.
Devendra Fandavis on Sharad Pawar : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होण्याची शक्यता आहे. शरद पवार यांनी काँग्रेस आणि त्यांच्या संबंधांबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर प्रादेशिक पक्षांच्या भवितव्याबाबतही शरद पवार यांनी मोठे विधान केलं आहे. निवडणुकीनंतर प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या जवळ येतील किंवा काही काँग्रेसमध्ये विलीनही होतील, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. त्यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महत्त्वाची प्रतिक्रिया दिली.
इंडियन एक्सप्रेसच्या मुलाखतीत शरद पवारांनी हे विधान केले. त्यामुळे आता शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. यावर बोलताना पवार गट काँग्रेसमध्ये विलीन करण्याचं शरद पवार यांच्या डोक्यात असेल, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यापूर्वीही त्यांनी अनेक पक्ष बनवले आणि विलीन केले असेही फडणवीस म्हणाले.
"त्यांचा जो काही शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे तो काँग्रेसमध्ये विलीन करण्याचे त्यांच्या डोक्यात असेल. तर यामध्ये काही नवल नाही. यापूर्वी देखील शरद पवार यांनी अनेकवेळा पक्ष तयार केला आणि ते काँग्रेसमध्ये गेले. त्यामुळे त्यांनी आता संकेत दिलाय की, आता त्यांचा पक्ष कदाचित त्यांना चालवणं शक्य होणार नाही. त्यामुळे शरद पवार त्यांचा पक्ष लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये विलीन करतील," असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
"याचं उत्तर शरद पवारच देऊ शकतील. कारण आता लोकसभा निवडणूक आहे आणि दोन तीन महिन्यांवरच विधानसभा निवडणूक आहे. शाहू फुले आंबडेकरांच्या विचारांचे पक्ष इंडिया आघाडीमध्ये एकत्र आहेत," अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी शरद पवार यांच्या विधानावर दिली आहे.
काय म्हणाले शरद पवार?
पुढील २ वर्षात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसशी अधिक जवळीक साधतील किंवा त्यातील काहींना काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा पर्याय त्यांच्या पक्षासाठी चांगला असेल असंही वाटू शकते. तसेच काँग्रेस आणि आमच्या विचारधारेत फारसा फरक नाही. आमच्या दोघांचीही विचारधारा गांधी-नेहरू यावर वाटचाल करत आहे असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसेच माझ्या पक्षाच्या विलिनीकरणाबाबत सहकाऱ्यांसोबत चर्चा केल्याशिवाय मी काहीही सांगू शकत नाही. वैचारिकदृष्ट्या आम्ही काँग्रेसच्या जवळ आहोत. परंतु पुढील काळातील निर्णय आणि रणनीती ही सामूहिकपणे विचार करून घेतले जातील. आम्हाला नरेंद्र मोदींसोबत जुळवून घेणे आणि ते पचवणे कठीण आहे असंही शरद पवार म्हणालेत.