NCP Sharad Pawar ( Marathi News ) : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आपला दांडगा जनसंपर्क आणि अचाट स्मरणशक्तीसाठी ओळखले जातात. पवार यांच्या याच गुणांचा प्रत्यय नुकताच पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात झालेल्या एका कार्यक्रमात आला आहे. शरद पवार हे बोलायला उभे राहिल्यानंतर एका कार्यकर्त्याने जोरदार घोषणाबाजी सुरू केली. गर्दीत घोषणा देणाऱ्या या कार्यकर्त्याला पवार यांनी क्षणात ओळखलं आणि त्यांचा नामोल्लेखही केला. पवार यांच्या या कृतीनंतर सभास्थळी टाळ्या आणि शिट्ट्यांचा गजर झाला.
पुण्यातील जुन्नर आंबेगावमधील विघ्नहर सहकारी साखर कारखाना लि. आसवणी आणि इथेनॉल प्रकल्पाच्या विस्तारणीकरणाचा उद्घाटन समारंभ नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाला शरद पवार यांच्यासह काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. उद्घाटन पार पडल्यानंतर उपस्थित शेतकऱ्यांना संबोधित करण्यासाठी शरद पवार उभे राहिले. त्यानंतर समोर बसलेल्या एका कार्यकर्त्याने शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थनार्थ घोषणा देण्यास सुरुवात केली. या कार्यकर्त्याकडे बघत कोंढाजी वाघ हेच आहेत ना? असं व्यासपीठावरून पवार यांनी विचारलं. त्यावर समोरून होकारार्थी उत्तर आलं आणि पवारांच्या स्मरणशक्तीने उपस्थित इतर नेत्यांसह नागरिकही अचंबित झाले.
रोहित पवार काय म्हणाले?
आजोबा शरद पवार यांची ८३ वर्ष वयानंतरही गर्दीतील कार्यकर्त्याला नावानिशी ओळखण्याची किमया पाहून त्यांचे नातू आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हेदेखील भारावले. रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहीत म्हटलं आहे की, 'आदरणीय साहेब तुमच्या लोकसंग्रहाला आणि स्मरणशक्तीला सलाम.'
दरम्यान, अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली असून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाला पुन्हा बळकटी देण्याचं खडतर आव्हान शरद पवारांसमोर आहे. हे आव्हान ते यशस्वीपणे पेलणार की त्यांना अपयशाचं तोंड पाहावं लागणार, हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.