Sharad Pawar: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा धुरळा उडत असल्याचे पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपाचे मंत्री, नेते महाराष्ट्रात प्रचार करताना पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह प्रचारसभांमध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर थेट शब्दांत हल्लाबोल करत आहेत. अमित शाह यांनी केलेल्या टीकेचा शरद पवार यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला आहे.
एका प्रचारसभेत बोलताना अमित शाह यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. ५ ऑगस्ट २०१९ रोजी नरेंद्र मोदीजींनी अनुच्छेद ३७० हटवले. काश्मीर कायमस्वरुपी भारतात आला. उद्धव ठाकरेंना विचारू इच्छितो की, तुम्ही मुख्यमंत्री बनण्यासाठी ज्यांच्या पायाशी पडलात ती काँग्रेस पार्टी आणि शरद पवार काय करत होते. उद्धव ठाकरेंना विचारू इच्छितो की, तुम्हाला मुख्यमंत्रिपद हवे आहे की, अनुच्छेद ३७० हटवणाऱ्याला विरोध करणारी काँग्रेस-राष्ट्रवादी पाहिजे. नरेंद्र मोदी यांनी ५ वर्षांत राम मंदिराची केस जिंकली आणि राम मंदिरही बांधून दाखवले, असे अमित शाह यांनी म्हटले होते. या टीकेला शरद पवार यांनीही एका प्रचार रॅलीला संबोधित करताना प्रत्युत्तर दिले.
PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे
भारताच्या लोकसभेच्या निवडणुकीकडे जगाचे लक्ष आहे. भारतात कोणते सरकार येणार याची उत्सुकता संपूर्ण जगाला लागली आहे. त्यामुळे जनतेनेही त्यादृष्टीने या निवडणुकीकडे पाहणे गरजेचे आहे. नरेंद्र मोदी देशाच्या कानाकोपऱ्यात फिरत आहेत. पण जाऊन सांगतात काय? या मोदींनी सांगावे दहा वर्षात काय केले? मोदी म्हणाले होते की, मला सत्ता द्या मी भाव देतो. मात्र काही झाले नाही. जवाहरलाल नेहरू व गांधींची टिंगल टवाळी करत करायची. आमची टिंगल करायची. माझ्यावर आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करायची, असा पलटवार शरद पवारांनी केला.
दरम्यान, अमित शाह म्हणतात, अयोध्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला गेलो नाही. आम्हालाही राम मंदिराचा आदर आहे. राम मंदिराचे काम पूर्ण झाले की,आम्ही नक्की जाऊ, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.