Sharad Pawar News: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात प्रचारसभांचा धडाका लावला होता. या सभांमध्ये बोलताना, पंतप्रधान मोदी यांनी ठाकरे गट आणि शरद पवार गटावर जोरदार टीका केली. या टीकेचा शरद पवार यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला असून, पंतप्रधान प्रचंड घाबरले आहेत, या शब्दांत पलटवार केला.
एकवेळ राष्ट्रीय स्वंयसेवकाची गरज होती. पण पक्षाने आपला विस्तार केला. भाजपा स्वत:चा कारभार करण्यासाठी सक्षम आहे, असे विधान भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या विचाराने स्ट्राँग असणाऱ्या संस्थेबाबत भाजपचे वरिष्ठ नेते जर गरज संपली असे म्हणत असतील तर भविष्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन पक्षांना धोक्याची घंटा आहे. ज्या दिवशी भाजपाला त्यांची गरज संपेल त्या दिवशी संघाबाबत त्यांनी जो अप्रोच घेतला तसाच अप्रोच राष्ट्रवादी आणि शिवसेनेबाबत घेण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा दावा शरद पवार यांनी केला.
पंतप्रधान प्रचंड घाबरले आहेत...
पंतप्रधान प्रचंड घाबरलेले आहेत. मोठ्या प्रमाणात त्यांनी सभा घेतल्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे सभा घेऊन ते सांगत काय आहेत, तर व्यक्तिगत हल्ले करतात. देशासमोरचे महत्वाचे प्रश्न बाजूला ठेवून व्यक्तिगत हल्ले करत आहेत. हे योग्य नाही. मला ते भटकती आत्मा म्हणाले. मुळात त्यांनी राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला पाहिजे. परंतु, त्यांनी लोकांची निराशा करण्याचे काम केले आहे. मला भटकती आत्मा म्हणणे, राहुल गांधींना शहजादा म्हणणे हे काही निवडणुकीचे प्रश्न नाहीत, असा पलटवार शरद पवार यांनी केला. ते एबीपी माझाशी बोलत होते.
आमच्यासोबत निष्ठावान कार्यकर्ते
पहिल्यांदा आमच्यासोबत शिवसेना निवडणूक लढत आहे. शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांना सोडून गेले पण शिवसैनिक जागेवरच आहेत. मोठा कट्टर शिवसैनिकांचा वर्ग आमच्या सोबत जोडला गेला याचा आम्हाला आनंद होता. शिवसेनेसोबतच आम आदमी पक्ष यांचा फायदा झाला. कशाची अपेक्षा न करता ते आम्हाला सहकार्य करत आहेत. त्यांच्याकडे कार्यकर्ते कमी आहेत पण जे आहेत ते खूप निष्ठावान आहेत. शिवसेना आणि आपचे कार्यकर्ते आमच्यासोबत जोडले गेले हा सुखद अनुभव होता, असे शरद पवार म्हणाले.