Maharashtra Vidhan Sabha election 2024 Vote Jihad: विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपने 'कटेंगे तो बटेंगे', 'एक है तो सेफ', या घोषणांबरोबरच 'व्होट जिहाद'चा मुद्दा लावून धरला आहे. विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात असताना भाजपने आता व्होट जिहादच्या मुद्द्यावर जास्त जोर दिला असून, देवेंद्र फडणवीसांनी खडकवासला येथील सभेत मौलाना सज्जाद नोमानी यांचा व्हिडीओ दाखवत महाविकास आघाडीवर व्होट जिहादचा आरोप केला आणि हल्ला चढवला. याला शरद पवारांनी साताऱ्यात बोलताना उत्तर दिले.
शरद पवार यांची साताऱ्यामध्ये पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत पवारांना व्होट जिहादच्या मुद्द्यावरून प्रश्न विचारण्यात आला.
देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारसभेत मौलाना सज्जाद नोमानी यांचा व्हिडीओ दाखवला. त्यामुळे राज्यातील राजकारण तापलं आहे. त्याबद्दल शरद पवार म्हणाले, "व्होट जिहाद हा शब्द देवेंद्र फडणवीसांनी काढला. हा काही इतर कुणी काढलेला नाही. आणि त्याचं कारण काही मतदारसंघात अल्पसंख्याकांनी महाविकास आघाडीच्या मतदारांना मतदान केलं."
व्होट जिहाद, पुणे, भाजपचा मतदार; पवार काय बोलले?
"असं आहे की, एखाद्या मतदारसंघात एखादा समाज जास्त असेल. उदाहरणार्थ, पुण्याच्या विशिष्ट भागात हिंदू समाज आहे, त्यांनी भाजपला मतदान केलं, भाजपला तर आम्हाला सवय आहे ती की, इथे असंच मतदान होतं. याचा अर्थ तो मी काही जिहाद समजत नाही. त्याला धार्मिक रंग देत नाही. तिथल्या लोकांची विचारधारा आहे", असे शरद पवार म्हणाले.
"त्यामुळे व्होट जिहाद हा शब्द वापरून अनेकदा देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एक प्रकारे धार्मिक रंग या निवडणुकीला देण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय. आम्ही त्याच्या एकदम विरोधी आहोत", अशी भूमिका शरद पवारांनी मांडली.
"बटेंगे तो कटेंगे याचा अर्थ..."
बटेंगे तो कटेंगेबद्दल शरद पवार म्हणाले, "असं आहे की, हे सगळे धार्मिक राजकारण आहे. बटेंगे तो कटेंगे असे विषय मांडणं, याचा अर्थ त्यांना खात्री झाली की, सरकार आपलं येत नाही आणि त्यामुळे ते धार्मिक तेढ घेऊन हिंदू-मुस्लिमांमध्ये चांगलं वातावरण असताना ते खराब करण्याचा प्रयत्न होतोय."