अहमदनगर: सध्याच्या काळात साखरेचे प्रचंड उत्पादन झाले आहे. ही शेतकऱ्यांसाठी मोठी संधी होती. मात्र सध्याच्या केंद्र सरकारने साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली. सरकारचे हे धोरण देशातील शेतकऱ्यांच्या हिताचे नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केले.
माजी केंद्रीय राज्यमंत्री तसेच महाराष्ट्र विधानसभेचे माजी उपाध्यक्ष बबनराव ढाकणे यांच्या यांच्यावरील "विधिमंडळातील बबनराव ढाकणे" या ग्रंथाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते झाले. तसेच केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाचे उद्घाटन झाले. त्यावेळी पवार बोलत होते. या कार्यक्रमास केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रताप ढाकणे, माजी मंत्री बबनराव ढाकणे, आमदार निलेश लंके आमदार संग्राम जगताप, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, शिवसेनेचे दक्षिण जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे आदी यावेळी उपस्थित होते.
इथेनॉल सारखे पर्याय कारखान्यांना निवडावे लागणार आहेत
यावेळी शरद पवार पुढे म्हणाले की, सध्या साखर एके साखर निर्माण करून चालणार नाही. इथेनॉल सारखे पर्याय कारखान्यांना निवडावे लागणार आहेत. केदारेश्वर सहकारी साखर कारखान्यांनी इथेनॉल प्रकल्प निर्मितीचा प्रकल्प सुरू केला ही कौतुकाची बाब आहे. आयुष्यभर बबनराव ढाकणे यांनी जनतेची सेवा केली. सरपंच, सभापती, आमदार, खासदार, मंत्री अशा विविध पदांवर त्यांनी काम केले. सर्व पदं त्यांनी सांभाळली व जनतेला न्याय देण्याचे काम केले. अन्यायाच्या विरोधात लढा दिला. त्यांचा वारसा प्रतापराव पुढे चालवत आहेत. या दुष्काळी भागातील जनतेने विशेषत: तरुणांनी प्रतापराव ढाकणे यांच्या मागे ताकद उभी करावी, असे आवाहन केले.
दरम्यान, यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक विकास मंत्री नितिन गडकरी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.