पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आयकर विभागाने नोटीस बजावली आहे. सन २००४ पासून लढवलेल्या निवडणुकांची चौकशी त्यांना करायची आहे, अशी माहिती पवार यांनी दिली. नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना देवेंद्र फडणवीस आनंदी दिसले नाहीत; मात्र भाजपत आदेश पाळावे लागतात, अशी टीकाही पवार यांनी केली. मोदीबागेतील निवासस्थानी पवार यांनी बुधवारी सायंकाळी पत्रकारांशी संवाद साधला. आयकर विभागाची प्रेमपत्रे आली आहेत. सन २००४ पासून मी लढविलेल्या निवडणुकांची चौकशी त्यांना करायची आहे, असे पवार यांनी सांगितले. विरोधी विचारांच्या लोकांवर केंद्रीय यंत्रणांचा दबाव आणण्याचाच हा प्रकार असल्याचे ते म्हणाले.नव्या सरकारविषयी पवार म्हणाले, शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाची अपेक्षा नसावी व फडणवीस यांनाही उपमुख्यमंत्रिपद घ्यावे असे वाटले नसेल; पण भारतीय जनता पक्ष आदेशावर चालतो. त्यामुळे फडणवीस शपथ घेताना आनंदी दिसत नव्हते. फडणवीस यांनी लोकांमधून निवडून येऊन सरकार बनवले असते तर मी त्यांना शाबासकी दिली असती. शिवसेना संपुष्टात आली असे वाटत नाही. याआधीही शिवसेनेत असे झाले आहे. विधिमंडळ पक्ष व संघटना वेगवेगळे असते. त्यामुळे शिवसेना संघटना उद्धव ठाकरे यांचीच राहील. भाजपने आता जो निर्णय घेतला तो २०१९ च्या निवडणुकीनंतर लगेच घेतला असता तर हा प्रश्नच निर्माण झाला नसता. शिवसेनेतून बाहेर गेलेले परत येतील, असे वाटत नाही. बंड केलेले सदस्य महाराष्ट्रात आले असते तर काही करता आले असते. नव्या सरकारबद्दल लोकांना विश्वास वाटला पाहिजे. ते किती दिवस टिकेल हे सांगायला ज्योतिषी नाही. महाविकास आघाडी म्हणून यापुढे निवडणूक लढवायची का, असा काही निर्णय झालेला नाही, असे पवार यांनी सांगितले.
शरद पवार म्हणाले, मला आयकर विभागाची प्रेमपत्रे आली आहेत!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2022 11:02 AM