Sharad Pawar on Census : गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकारण पेटलं आहे. ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करत आहेत. तर दुसरीकडे ओबीसी समाजाने मनोज जरांगेंच्या मागणीला विरोध केला आहे. मराठा आंदोलकांनीही राजकीय नेत्यांना त्यांची आरक्षणाबाबती भूमिका नेमकी काय आहे असं विचारण्यास सुरुवात केली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, असं म्हटलं आहे.
जोपर्यंत संख्या कळणार नाही तोपर्यंत सरकारसमोर प्रश्न मांडता येणार नसल्याचे मत शरद पवार यांनी व्यक्त केलं. यासाठी जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. सोलापुरातील एका कार्यक्रमात शरद पवार यांनी हे वक्तव्य केलं आहे. सोलापुरात एका मेळाव्यासाठी शरद पवार आले होते. मात्र त्याआधी शरद पवार यांची गाडी अडवण्यात आली होती. त्यानंतर एका कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी हे विधान केलं आहे.
"जनगणना केल्याचा आग्रह करण्यात येत आहे. शेवटी तो समाज नक्की किती आहे, कोणत्या गावात आहे, त्यांची आकडेवारी काय ही सगळी सरकारच्या समोर येत नाही तोपर्यंत सरकारी योजनांचा लाभ किती टक्क्यांपर्यंत द्यायचा यासंदर्भातील निर्णय होऊ शकत नाही. त्यासाठी जनगणना ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. एकदा किती लोक आहेत, किती कुटुंबे आहेत हे स्पष्ट होऊद्या. ती संख्या कळल्यानंतर त्या प्रमाणामध्ये त्यांच्या उन्नतीसाठी सरकारने आर्थिक तरतूद करावी आणि सवलती द्याव्यात. त्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे," असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
शरद पवारांची यांची गाडी मराठा आंदोलकांनी रोखली
मराठा आरक्षणप्रश्नावरुन शरद पवार यांनाही मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या पवारांना अगोदर कुर्डूवाडीजवळ मराठा आंदोलकांनी अडवले. तसेच शरद पवार यांच्याकडे मराठा आरक्षणप्रश्नी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी पवार यांनी मराठा आरक्षणाला आपला पूर्वीपासूनच पाठिंबा असल्याचे सांगितले. त्यानंतर बार्शीतल्या शेतकरी संवाद मेळाव्यातही पवार हे भाषण करत असताना आंदोलकांकडून पवारांना काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी करण्यात आली. तसेच एका तरुणाने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.