शरद पवारांनी ठेवले अजित पवारांवर बोट; केंद्रीय निवडणूक आयोगाला उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 06:35 AM2023-08-08T06:35:28+5:302023-08-08T06:37:24+5:30
अजित पवारांनी पक्षावर आणि चिन्हावर दावा करणे हे चुकीचे असल्याचे शरद पवार गटाने निवडणूक आयोगाला पाठवलेल्या उत्तरात म्हटले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्याअजित पवार गटाने दाखल केलेल्या दाव्यानंतर केंद्रीय निवडणूूक आयोगाने पाठवलेल्या नोटीसला शरद पवार गटाने उत्तर दिले आहे. राष्ट्रवादीमध्ये दोन गट नाहीत. शरद पवारच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यामुळे अजित पवारांनी पक्षावर आणि चिन्हावर दावा करणे हे चुकीचे असल्याचे शरद पवार गटाने निवडणूक आयोगाला पाठवलेल्या उत्तरात म्हटले आहे.
अजित पवारांच्या याचिकेतून राष्ट्रवादीत दोन गट पडल्याचे कोणतेही पुरावे नाहीत. राष्ट्रवादीत कुठला वाद आहे हे सिद्ध करण्यास ते प्राथमिकदृष्ट्या सक्षम नाहीत. प्रथम दर्शनी निवडणूक आयोगानेही राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वातील पक्षात आणि अजित पवार गटात वाद असल्याचे सिद्ध केले नाही. १ जुलै २०२३ च्या आधी अजित पवारांनी शरद पवारांविरोधात कुठली तक्रार दिली नव्हती. राष्ट्रवादीच्या कुठल्याही बैठकीत त्यांनी पवारांना विरोध केला नव्हता, असे शरद पवार गटाने या उत्तरात म्हटले आहे.