पुतण्याच्या '' सॉफ्ट हिंदुत्वा ''ला काकांची कात्री
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 12:34 PM2019-09-18T12:34:57+5:302019-09-18T12:40:03+5:30
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या झेंड्यासोबत भगवा झेंडा लावण्याचा निर्णय घेऊन पक्ष 'सॉफ्ट हिंदुत्वा' चा स्विकार करीत असल्याचे दर्शविले होते.
पुणे : विधानसभेच्या तोंडावर गळती झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये अंतर्गत गटबाजीचेही आव्हान आहे. त्यातच आता वरिष्ठ पातळीवरील नेत्यांच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे कार्यकर्ते संभ्रमात पडू लागले आहेत. काही दिवसांपुर्वी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या झेंड्यासोबत भगवा झेंडा लावण्याचा निर्णय घेऊन पक्ष 'सॉफ्ट हिंदुत्वा' चा स्विकार करीत असल्याचे दर्शविले होते. परंतू, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी अहमदनगरमध्ये अजित पवारांची ही भूमिका वैयक्तिक असल्याचे सांगत 'सॉफ्ट हिंदुत्वा' ला धर्मनिरपेक्षतेची कात्री लावली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षामधून बरेचसे नेते आणि कार्यकर्ते भाजपा-सेनेमध्ये प्रवेश करु लागले आहेत. ऐन लढाईच्या काळातच शिलेदार विरोधी पक्षाच्या डेऱ्यात दाखल होऊ लागल्याने दोन्ही पक्षांची चिंता वाढली आहे. राष्ट्रवादीकडून राज्यभरामध्ये भाजपा-सेनेच्या कारभाराचे वाभाडे काढण्यासाठी तसेच जनसंवादासाठी 'शिवस्वराज्य यात्रा ' काढली. या यात्रेदरम्यान, अजित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीच्या कार्यक्रमांमध्ये पक्षाच्या झेंड्यासोबतच भगवा ध्वजही लावण्यात येईल. भगवा ध्वज ही काही भाजपा-सेनेची मक्तेदारी नाही अशी भूमिका मांडत आपल्या भूमिकेचे समर्थन केले होते.
सत्ताधारी पक्षांच्या हिंदुत्वाच्या अजेंड्यावर लढवल्या जाणाऱ्या निवडणुका, २०१४ सालच्या विधानसभा आणि लोकसभा तसेच २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकांमध्ये मिळालेले यश पाहता बहुसंख्यांकांमधील मते वळविण्याचा हा प्रयत्न असल्याचेही बोलले जाऊ लागले होते. दोन्ही निवडणुका पाहता मराठा समाजही पक्षापासून दुरावल्याचे जाणीव झाल्याने या समाजाला आकर्षित करण्यासाठी भगवा झेंडा लावण्याचा निर्णय घेऊन एकप्रकारे 'सॉफ्ट हिंदुत्वा' चा अंगिकार करण्यात आला. परंतू, त्याच वेळी राष्ट्रवादी हा धर्मनिरपेक्ष आणि जात-पात विरहीत राजकारण करणारा पक्ष असतानाही एका विशिष्ट रंगाचा झेंडा लावण्याचा निर्णय का घेतला गेला असा प्रश्न पक्षातील कार्यकर्त्यांना पडला होता. कारण राष्ट्रवादीमध्ये विविध समाजांचे ' सेल' असून प्रत्येक समाजाचा वेगळ्या रंगाचा झेंडा आहे. याविषयी पक्षांतर्गत सकारात्मक आणि नकारात्मक चर्चा सुरु होत्या.
त्यातच पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी, ही अजित पवार यांची वैयक्तिक भूमिका असून पक्षाची अधिकृत भूमिका नसल्याचे म्हटले आहे. एकं दरीत पवार यांनी पक्षाच्या आणि स्वत:च्या धर्मनिरपेक्ष ह्यइमेजह्णला धक्का लागणार नाही याची काळजी हे वक्तव्य करताना घेतली. त्यामुळे भगवा ध्वज लावण्याचा निर्णय घेताना पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर याविषयी संवाद झाला होता की नाही असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. पक्षांतर्गतच जर भूमिकांविषयी एकमत नसेल तर कार्यकर्त्यांनी नेमक्या कोणत्या भूमिका घ्यायच्या याविषयी संभ्रम निर्माण होऊ लागला आहे. पक्षाला पडझडीच्या या काळात हे परवडणारे नक्कीच नाही.
=====
शिवस्वराज्य यात्रेदरम्यान भगवा ध्वज राष्ट्रवादीच्या कार्यक्रमांमध्ये लावण्याविषयी घोषणा झाली होती. परंतू, पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी याविषयी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे पवार यांनी भगवा ध्वज न लावण्याची भूमिका हीच पक्षाची अधिकृत भूमिका आहे. कार्यकर्त्यांमध्ये कोणताही संभ्रम नसून पवार साहेबांच्या धर्मनिरपेक्ष भूमिकेविषयी सर्वांना कल्पना आहे.