सोलापूर : वंचित बहुजन आघाडीला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे़ अॅड. बाळासाहेब आंबेडकर हे ३७० जातींचे प्रतिनिधीत्व करतात. यामुळेच त्यांनी लोकसभेमध्ये अनेक जातींच्या लोकांना प्रतिनिधीत्व दिले़ याचबरोबर आगामी विधानसभेची तयारी ही सुरू केली असून, वंचितमधून २५ मुस्लीम उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे़ एमआयएम पक्षाने स्वत:हून वंचितमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला़ जे वंचितच्या जीवावर निवडून आले तेच ताटात विष कालवत आहेत असा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या संसदीय मंडळाचे अध्यक्ष अॅड. आण्णाराव पाटील यांनी केला.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ‘सत्ता संपादन रॅली’चे आयोजन राज्यभर करण्यात येत आहे़ ही रॅली सोलापुरात आल़ी. यानिमित्त हुतात्मा स्मृती मंदिर येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी अॅड. पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी जावेद पटेल, प्रदेश प्रवक्ते आनंद चंदनशिवे, अमृता अलदार, नगरसेविका ज्योती बमगोंडे, शंकरराव लिंगे, सचिन माळी, बाळासाहेब बंडगर, उमर शेख, विठ्ठल पाथरुट मंचावर होते़.
पाटील म्हणाले, हे सरकार ईव्हीएम मशिनच्या बळावर निवडून आले आहे़ आम्हाला उशीर लागला तरी प्रामाणिकपणे सत्तेवर येऊ़ साधी कविता करणारा जर आज केंद्रीय मंत्री होऊ शकतात तर बाबासाहेबांचे वंशज अॅड़ प्रकाश आंबेडकर का मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत़? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. वंचित बहुजन आघाडीला राज्यातून चांगला प्रतिसाद मिळत असून २८८ जागांसाठी साडेसहा हजार उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत, अशी माहितीही यावेळी त्यांनी दिली.
यावेळी यशपाल भिंगे, नगरसेवक चंदनशिवे, सचिन माळी, शंकर लिंगे, अमृता अलदार यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन अंजना गायकवाड यांनी केले.
सहावेळा वीज गेलीसकाळी ११ वाजल्यापासूनच हुतात्मा स्मृती मंदिरमध्ये शीतल साठे, सचिन माळी यांचा जलसाचा कार्यक्रम सुरू होता़ या जलसालाही उत्तम प्रतिसाद उपस्थितांनी दिला़ या कार्यक्रमानंतर दुपारी अनेक नेत्यांचे मनोगत सुरू झाले़ या दरम्यान हुतात्मा सभागृहात ६ वेळा लाईट गेली़ यावेळी उपस्थितांनी मोबाईलचे टॉर्च सुरू करत घोषणाबाजी केली़ दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सत्ता संपादन रॅली ही सोलापुरात दाखल झाली़ या रॅलीचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले़ डॉ़ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी या परिसरात गर्दी केली होती़