Sharad Pawar Team India: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय राजकीय संबंध सर्वश्रुत आहे. सीमेवरील वातावरण अतिशय तणावाचे असल्याचे दिसून येते. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी पाकिस्तान भेटीचा एक किस्सा सांगितला. जेव्हा शरद पवार बीसीसीआयचे अध्यक्ष होते, तेव्हाची ही गोष्ट आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात उपस्थित लोकांना संबोधित करताना त्यांनी आपल्या पाकिस्तान, विशेषतः कराची भेटीच्या जुन्या आठवणी सांगितल्या. ते टीम इंडियाच्या खेळाडूंसोबत क्रिकेट मालिकेत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानला गेले होते.त्यावेळी ते पाकिस्तानी लोकांना कसे भेटले, त्यांच्यासोबतचे काय अनुभव होते, याबाबत शरद पवार यांनी सांगितले.
"मी एकदा एक गोष्ट बोललो होतो ज्यावरून मीडिया माझ्या मागे लागला. मी बीसीसीआयचा अध्यक्ष असताना एकदा भारत आणि पाकिस्तानचा सामना कराचीत होणार होता. खरे सांगायचे तर, त्यावेळी भारत सरकारकडून पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी कोणतीही परवानगी नव्हती. तेव्हा मी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे विनंती केली. तरुणांना खेळण्याची संधी देण्याबाबत तो प्रस्ताव होता. त्यानंतर मनमोहन सिंग यांनी परवानगी दिली," असे शरद पवार म्हणाले.
टीम इंडियाला कराची फिरायचं होतं तेव्हा...
शरद पवार पुढे म्हणाले, "तेव्हा खेळाडूंनी मला सांगितले- आम्हाला कराचीला जायचे आहे आणि फिरायचं आहे. आम्ही निघालो आणि एका ठिकाणी नाश्त्यासाठी थांबलो. नाश्त्यानंतर आम्ही पैसे देण्यासाठी काउंटरवर पोहोचलो असता हॉटेल मालकाने पैसे घेणार नसल्याचे सांगितले. ते म्हणाले की तुम्ही आमचे पाहुणे आहात. आम्ही त्याला पैसे घेण्याचा आग्रह करत राहिलो, पण त्याने आमचे काहीच ऐकले नाही. उलट तो म्हणाला की, टीव्हीवर दिसणारे खेळाडू कराचीला आले आहेत. यातच खूप काही मिळालं. आम्ही पाहुण्यांकडून पैसे घेत नाही. आम्ही खूप आग्रह केला पण त्याने शेवटपर्यंत पैसे घेतले नाहीत."
"क्रिकेटमुळे पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंकेत दौऱ्यासाठी आम्हाला जायला लागायचे. पाकिस्तान आणि बांगलादेशातील लोकही भारतात येण्यास उत्सुक असल्याचे आम्हाला आढळून आले. कारण त्यांचे काही नातेवाईक भारतात राहतात. सर्वसामान्यांच्या मनात भारताबद्दल द्वेष नाही. सर्वसामान्यांमध्ये एकमेकांबद्दल पुरेसे प्रेम आणि आदर आहे. राजकारणाशी संबंधित लोकांमध्ये मात्र द्वेष आणि दुरावा आहे. जगातील सर्व धर्माचे, सर्व भाषांचे लोक एकत्र आले पाहिजेत. एकात्मतेची भावना असली पाहिजे. पण धर्माच्या नावावर राजकारण करणारे लोक समाजात द्वेष पसरवत आहेत हे खेदजनक आहे," अशी खंतही शरद पवारांनी व्यक्त केली.