Sharad Pawar Jitendra Awhad, Presidential Elections: राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाची चर्चा आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीतील (UPA) बऱ्याच पक्षांनी शरद पवार यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्रातील काही घटक पक्षांनीदेखील पवार राष्ट्रपती झाल्यास तो महाराष्ट्राचा सन्मान असेल, असे मत व्यक्त केले आहे. अशा सर्व चर्चा रंगलेल्या असताना, राष्ट्रवादीचे नेते आणि महाविकास आघाडीतील मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मात्र वेगळंच गणित मांडलं आहे. शरद पवार यांना राष्ट्रपती करू नये, असं म्हणत त्यांनी त्यामागचं कारणही स्पष्ट केलं आहे.
पवारांनी राष्ट्रपती का होऊ नये?
"राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीबाबत संख्याबळ पाहून निर्णय घेण्यात यायला हवा. शरद पवार यांच्यासारखे व्यक्तिमत्व स्वत:ला राष्ट्रपती भवनाच्या कोंडवाड्यात कोंडून घेऊ शकत नाहीत. जे राजकारणी मुख्यप्रवाहात असतात, त्यांनी मुख्यप्रवाहातच राहावं. ज्या पद्धतीने शरद पवार आजही ग्रामीण भागात फिरतात, लोकांशी संवाद साधतात ते पाहता त्यांनी याचपद्धतीचे काम कायम करावे असं मला वाटतं. ते राष्ट्रपती झाले तर त्यामुळे महाराष्ट्राचा सन्मान होईल हे खरं आहे. पण शरद पवार जोपर्यंत लोकांच्यात मिसळत नाहीत तोवर त्यांच्या चेहऱ्यावर तेज आणि आनंद दिसत नाही. त्यामुळे त्यांनी लोकांमध्येच राहावे, तोच त्यांचा खरा हक्क आहे", असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
राष्ट्रपती पदाऐवजी शरद पवारांना UPA चं प्रमुख करावं!
"विरोधी पक्षातील सक्षम चेहरा म्हणून शरद पवारांचे नाव घेतलं जात आहे. पण विरोधी पक्षांना खरंच तसं वाटत असेल तर पवार यांना राष्ट्रपती करण्यापेक्षा त्यांचा UPA चे प्रमुख नेते म्हणून जाहीर करावं आणि २०२४ची रणनिती आखण्यास सुरूवात करावी. शरद पवार यांना प्रधानमंत्री करा असं मी आता म्हणत नाही. पण जर आतापासूनच गणितांची जुळवाजुळव केली तर २०२४च्या निवडणुकांचे गणित अवघड जाणार नाही", असे आव्हाडांनी स्पष्ट शब्दात नमूद केले.