मुंबई : नार-पार लिंक प्रकल्पातील महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी गुजरातला देऊ नये, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी जलसंपदा विभागाच्या अधिका-यांना केली आहे.यशवंतराव चव्हाण सेंटर येथे दमणगंगा, नार-पार, औरंगा - अंबिका आदी खो-यांतील प्रस्तावित नदीजोड प्रकल्पांबाबत पवार यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांसमवेत बैठक घेतली. आ. जयवंत जाधव आणि जलचिंतन संस्थेचे अध्यक्ष इंजि. राजेंद्र जाधव यांनी या बैठकीसाठी पुढाकार घेतला होता. बैठकीला अधिकाºयांसह आमदार पंकज भुजबळ, नरहरी झिरवाळ, जीवा पांडू गावित, सतीश चव्हाण, श्रीराम शेटे, जिल्हा परिषद सदस्या डॉ. भारती पवार, उदय रकिबे उपस्थित होते. या वेळी नाशिकचे लोकप्रतिनिधी तसेच जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव इकबालसिंग चहल यांची बाजू पवार यांनी समजून घेतली.राज्याच्या हिताचा विचार करून पार-तापी-नर्मदा व दमणगंगा-पिंजाळ लिंक योजनेच्या डीपीआरमध्ये सुधारणा केली आहे. पार-तापी नर्मदा लिंक योजनेत सुधारणा करून नार-गिरणा आणि पार-गोदावरी लिंक या सुधारित नदीजोड योजना समाविष्ट केल्या आहेत. तसेच दमणगंगा-पिंजाळ लिंकमध्ये सुधारणा करून दमणगंगा-एकदरे-गंगापूर लिंकमार्फत ५ टीएमसी पाणी गंगापूर धरणात वळवले जाणार आहे. तसेच दमणगंगा- वैतरणा- कडवा- देवनदी लिंक प्रकल्पाद्वारे ७ टीएमसी पाणी सिन्नर व शिर्डीसाठी वळणार असल्याची माहिती चहल यांनी दिली. या सर्व प्रकल्पांना ११ हजार कोटी खर्च येणार असून, त्यातील ९० टक्के रक्कम केंद्र सरकार व १० टक्के रक्कम राज्य सरकारकडून देणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. मात्र १५ टीएमसी पाणी गुजरातला देण्यास आ. जाधव, आ. जीवा पांडू गावित, श्रीराम शेटे आदींनी बैठकीत विरोध दर्शविला.
नार-पारचे महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी पाणी गुजरातला देऊ नका: शरद पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 3:37 AM