अहमदनगर : आज गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डी येथील साईबाबा मंदिरात मोठा उत्सव पार पडला. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil) या उत्सवात सहभागी झाले. त्यांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला. महाराष्ट्राला लोकांचे सरकार मिळाले आहे. त्यामुळे जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत, असे म्हणत राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील सरकारसाठी साईबाबांकडे प्रार्थना केल्याचे सांगितले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar) यांच्यावरही राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका केली.
राज्यामध्ये कोविडचे संकट पुन्हा डोके वर काढत आहे. कोविडचा संपूर्ण नायनाट व्हावा अशी प्रार्थना साईबाबांकडे केली. तसेच राज्यातील जनतेच्या अपेक्षा राज्य सरकारने पूर्ण कराव्यात यासाठी साईबाबांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना शक्ती द्यावी, आशीर्वाद द्यावा, अशा प्रकारची विनंती मी साईबाबांकडे केली असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. तसेच, शरद पवार यांनी राज्य सरकार विषयी केलेल्या टीकेसंदर्भात राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले की, शरद पवार यांनी स्वतः आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप व शिवसेनेने युती म्हणून निवडणूक लढविली होती. 160 पेक्षाही जास्त जागा जिंकल्या होत्या. शेवटी जनतेच्या भावनेशी विश्वासघात कोणी केला, याचे पवारांनी आत्मचिंतन करावे, अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
याचबरोबर, महाराष्ट्राला लोकांचे सरकार मिळाले आहे. त्यामुळे जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. अडीच वर्षांत राज्याची झालेली अधोगती, कोणताही समाज घटक खुष नव्हता. कारण हे विश्वासघाताने आलेले सरकार होते. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात पाच वर्षे जनतेने राज्याच्या विकासाची घोडदौड पाहिली आहे. त्यामुळे राज्यात 110 पर्यंत भाजपचे आमदार जनतेने निवडून दिले होते. तोच जनतेचा आशीर्वाद आता पूर्ण होईल, असा विश्वास राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
काँग्रेसने केव्हाच आपला स्वाभिमान गहाण टाकला आहे - राधाकृष्ण विखे पाटीलराष्ट्रपती निवडणुकीत शिवसेनेने एनडीए उमेदवाराला समर्थन कोणत्याही दबावाखाली दिले नाही, असे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. पण, उद्धव ठाकरे यांनी आमच्याशी चर्चा न करता हा निर्णय घेतल्याची टीका काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली होती. यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी थोरातांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला आहे. काँग्रेसने केव्हाच आपला स्वाभिमान गहाण टाकला आहे, म्हणत त्यांनी काँग्रेसवर बोचरी टीका केली आहे. मूळात महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस पक्षाला नगण्य स्थान होते. फक्त अर्थप्राप्तीसाठी काँग्रेसचे मंत्री महाविकास आघाडीसोबत गेले होते. त्यांचे किती महत्त्व होते? हे यापूर्वी जनतेने पाहिलेले आहे. मला वाटते काँग्रेसने आपला स्वाभिमान केव्हाच गहाण टाकला आहे. मूर्मू यांना पाठिंबा देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी आम्हाला विचारले नाही, आज जी टीका होतीये, मला वाटतेय सत्तेत असताना देखील त्यांनी कधी विचारले नाही. काँग्रेसला राज्यात गृहीत धरण्यात आले होते. त्याचे दु:ख आणि शल्य काँग्रेस नेत्याच्या बोलण्यातून मला दिसत आहे, असेही राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.