'शरद पवारांनी आता निवृत्ती घ्यायला हवी', जिवलग मित्र सायरस पूनावाला यांचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 08:21 PM2023-08-30T20:21:50+5:302023-08-30T20:22:10+5:30
शरद पवारांनी निवृत्त व्हावे, असे मत त्यांचे जिवलग मित्र आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफि इंडियाचे प्रमुख सायरस पूनावाला यांनी व्यक्त केले आहे.
Cyrus Poonawala Sharad Pawar: काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रीमो शरद पवार यांनी पक्षाचे अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली होती. यादरम्यान त्यांच्या निवृत्तीची चर्चा जोर धरू लागली, मात्र नंतर त्यांनी आपला निर्णय बदलला. त्याच्या काही दिवसांनंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले आणि शरद पवारांनी निवृ्त्ती घेण्याचा सल्ला अजित पवार गटाकडून करण्यात आला. दरम्यान, पुन्हा एकदा पवारांच्या निवृत्तीची चर्चा झाली आहे. शरद पवारांचे जिवलग मित्र आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रमुख सायरस पूनावाला यांनी पवारांना निवृत्तीचा सल्ला दिला आहे.
भारतातील लससम्राट अशी ओळख असलेले सीरम इन्स्टिट्यूट ऑफि इंडियाचे(Serum Institute chairman) प्रमुख सायरस पूनावाला(Cyrus Poonawalla) आणि शरद पवार (Sharad Pawar) फार जुने मित्र आहेत. पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना पूनावाला यांनी पवारांना निवृत्तीचा सल्ला दिला. यावेळी पत्रकारांना त्यांना राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर प्रश्न विचारला. त्यावर बोलताना सायरस पूनावाला यांनी पवारांच्या कामाचे कौतुक केले, पण त्यांना निवृत्तीचा सल्लाही दिला.
पूनावाला म्हणाले की, "शरद पवार यांनी दोन वेळा पंतप्रधान होण्याची संधी घालवली. त्यांनी देशासाठी मोठे योगदान दिले आहे. ते फार हुशार आहेत. त्यांना जनतेची आणखी सेवा करता आली असती. मात्र आता त्यांचे अन् माझे वय झाले आहे. आता आम्ही निवृत्ती घ्यायला हवी," असं वक्तव्य सायरस पूनावाला यांनी केले. पूनावाला यांचे वक्तव्य अशावेळी आले, जेव्हा अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनीही पवारांनी निवृत्ती घेण्याचे मत जाहीरपणे मांडले आहे. पूनावाला यांच्या वक्तव्यावर शरद पवार काय प्रतिक्रिया देणार, हे पाहणे महत्वाचे ठरेल.