चीनच्या घुसखोरीवरून आक्रमक झालेल्या राहुल गांधींना पवारांनी फटकारले, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 04:35 PM2020-06-27T16:35:37+5:302020-06-27T16:37:22+5:30
चीनच्या घुसखोरीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारणही पेटले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी चीनच्या घुसखोरीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर सातत्याने टीका करत आहेत.
सातारा - चीननेलडाखमधील काही भागात केलेला घुसखोरीचा प्रयत्न आणि गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये हिंसक झटापट होऊन त्यात भारताच्या २० जवानांना आलेले वीरमरण यामुळे सध्या देशात तणावाचे वातावरण आहे. तसेच चीनच्या घुसखोरीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारणही पेटले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी चीनच्या घुसखोरीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर सातत्याने टीका करत आहेत. दरम्यान, देशाच्या संरक्षणाच्या मुद्यावरून राजकारण करणे योग्य नाही असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी राहुल गांधी यांना फटकारले आहे. तसेच १९६२ च्या युद्धात चीनने भारताचा लखाडमधील सुमारे ४५ हजार चौकिमी भूभाग बळकावला होता, तो अद्याप परत मिळवता आलेला नाही, अशी आठवणही पवार यांनी यावेळी करून दिल्ली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे आज सातारा दौऱ्यावर आलेले असताना त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी लडाखमधील घुसखोरीबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले की, भारत आणि चीनमध्ये तणाव निर्माण झालेला असला तरी चीन आणि भारत यांच्यात यु्द्ध होण्याची शक्यता कमी आहे. गलवानमधून दौलत बेग ओल्डीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सध्या भारत सरकारकडून सुरू आहे. या रस्त्याचा एका बाजूला भारत आहे तर दुसऱ्या बाजूला चीनचा ताबा आहे. त्यामुळे चीनचे सैनिक या रस्त्यावर येत असतात. त्यातूनच गलवानमध्ये झटापट झाली.
दरम्यान, भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर होणाऱ्या झटापटीवेळी शस्त्रांचा वापर होत नाही. त्यासाठी आपण संरक्षण मंत्री असताना चीनमध्ये जाऊन केलेल्या वाटाघाटी आणि नंतर नरसिंह राव यांच्या नेतृत्वात चीनसोबत झालेल्या कराराचे असलेले महत्त्वही पवार यांनी सांगितले. दोन देशांच्या सैन्यामध्ये जेव्हा संघर्ष होतो तेव्हा गोळीबारासारख्या घटना घडतात. मात्र गलवानमध्ये दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये झटापट झाली तेव्हा गोळीबार झाला नाही. त्याचे कारण हा करार आहे. चीनच्या सैनिकांनी भारताच्या हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्यावर आपल्या जवानांनी त्यांना रोखले. त्यातून पुढे संघर्ष झाला. गस्त सुरू असताना कुणी आडवं आलं आणि संघर्ष झाला तर त्याला संरक्षण मंत्रालयाचं अपयश म्हणता येणार नाही. तिथे संघर्ष झाला याचा अर्थ आपले जवान जागरूक होते. जर तसे नसते तर चिनी सैनिक कधी आले आणि गेले ते कळलंच नसतं, असे विधान पवार यांनी केले.
यावेळी पवार यांनी १९६२ च्या युद्धाची आठवण करून देत राहुल गांधी यांना अनुभवाचे बोलही सुनावले. आता लडाखमध्ये झालेल्या संघर्षात चीनने किती भाग बळकावला आहे याबाबत काही माहिती नाही. मात्र १९६२ च्या युद्धात चीनने लडाखमधील बळकावेला ४५ हजार चौकिमी भाग सध्या चीनच्या ताब्यात आहे. तो भाग आपल्याला अद्याप मुक्त करता आलेला नाही, ही बाब विसरता येणार नाही. त्यामुळे असे आरोप करताना आपण भूतकाळात आपण काय केले आहे, याचा विचार केला पाहिजे. राष्ट्रीय सुरक्षेसारख्या प्रश्नावर राजकारण आणणे योग्य नाही, असेही पवार यांनी सांगितले.