Sharad Pawar Ajit Pawar, Russian Lady: महाराष्ट्रात आणि विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात सध्या वारीचे वातावरण आहे. वारी हा एक वेगळाच सोहळा असतो. वारकऱ्यांच्या या सोहळ्याचा उत्साह साऱ्यांनाच मोहित करतो. या वारीत यावर्षी पहिल्यांदाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार दाखल झाल्या. रविवारी बारामती येथे त्यांनी पालखी सोहळ्याला भेट दिली. अजितदादांनी सपत्नीक बारामती ते काटेवडी वारकऱ्यांसोबत पायी चालत वारीत (Aashadhi Wari) सहभाग घेतला आणि विठुनामाचा गजर केला. पण, शरद पवार यांनी मात्र रशियन महिलेचा किस्सा सांगून अजितदादांच्या वारीतील सहभागावर टोला लगावला.
काय म्हणाले शरद पवार?
"मी एकदा रशियात गेलो होतो. ते एक महिला मला भेटल्या आणि त्यांनी माझ्याशी मराठीत संवाद साधला. अधिक चर्चा केल्यावर, त्या महिला वारीला हजेरी लावतात असे त्यांनी सांगितले. त्या वारीला पुण्यात आल्या त्यावेळी मी त्यांना माझ्या घरी येण्याचे निमंत्रण दिले. त्या देखील निमंत्रणाला मान देऊन आल्या. त्यावेळेस त्यांनी मला एक किस्सा सांगितला. त्या म्हणाल्या की पुण्यात एका महिलेने त्यांना विचारले होते की, तुम्ही वारी कुठून कुठपर्यंत करता? त्यावर, त्या रशियन महिला म्हणाल्या होत्या की, वारी ही आळंदी ते पंढरपूर अशीच करायची असते. जे लोक अधे-मध्ये जाऊन वारी करतात, त्यांना हौशे-नवशे-गवसे म्हणतात," अशी आठवण सांगून शरद पवारांनी अजितदादांच्या बारामती ते काटेवाडी वारीवर टोला लगावला.
दरम्यान, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात, टाळ मृदंगाच्या गजरात, हाती दिंड्या-पताका, मुखी विठ्ठल नाम अशा भक्तिमय वातावरणात आज काटेवाडीकडे प्रस्थान झाले. शहरातील मोतीबागेत अजितदादांनी पुष्पहार अर्पण करून संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले. त्यानंतर ते वारीत सहभागी झाले. यावेळी अजितदादांच्या समवेत सेल्फी काढण्यासाठी हस्तांदोलन करण्यासाठी अनेकांनी गर्दी केल्याचे दिसले. यावेळी काही काळ अजितदादांनी पालखी रथाचे सारथ्यही केले.