Sharad Pawar vs Eknath Shinde: महाविकास आघाडीत शिवसेनेची घुसमट होत असल्याचा आरोप करत एकनाथ शिंदे आणि इतर काही आमदारांनी शिवसेनेशी बंडखोरी केली. कालांतराने त्यांना शिवसेना आणि अपक्ष असा सुमारे ५० आमदारांचा पाठिंबा मिळाला. त्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे गटाने भाजपासोबत राज्यात सरकार स्थापन केले. यापुढे जात आता शिंदे गट आम्हीच खरी शिवसेना असा दावा करत धनुष्यबाण या चिन्हासाठी लढाई लढत आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाने बंडखोरांना गद्दार म्हटल्यानंतर, शिंदे गटातील काहींनी शरद पवार यांनी काँग्रेसविरोधात केलेल्या बंडाचे दाखले दिले. या साऱ्यांना आज शरद पवार यांनी चांगलेच सुनावले.
"धनुष्यबाण हे शिवसेनेचे चिन्ह आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापनेपासून स्वीकारलेल्या आणि महाराष्ट्राच्या मनात असलेल्या एखाद्या राजकीय पक्षाचे चिन्ह काढून घेणे, त्यातून वादविवाद वाढवणे हे योग्य नाही. जर एकनाथ शिंदे किंवा इतरांना काही वेगळी भूमिका घ्यायची असेल तर ते जरूर स्वतःचा पक्ष काढू शकतात. ते चिन्ह करू शकतात. माझे काँग्रेससोबत मतभेद झाले तेव्हा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस हा वेगळा पक्ष काढला. घड्याळ हे वेगळे चिन्ह घेतले. आम्ही त्यांचे चिन्ह मागितले नाही आणि वाद वाढवला नाही. पण काही ना काही तरी करून वाद वाढविण्याची भूमिका कोणी घेत असेल तर लोक त्याला पाठिंबा देणार नाहीत", अशा शब्दांत शरद पवार यांनी शिंदे गटाला चांगलाच दणका दिला.
शिवसेना दुबळी कशी करता येईल याची आखणी भाजपाने केली!
"महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप अनेक वर्ष एकत्र होते. आज शिवसेनेचे विभाजन करून शिवसेना दुबळी कशी करता येईल याची आखणी भारतीय जनता पार्टीने केली. त्याला एकनाथ शिंदे आणि इतर लोकांची मदत झाली. त्यामुळे महाराष्ट्रातील शिवसेनेवर एक प्रकारचा आघात त्यांच्या एकेकाळच्या मित्रपक्षाने केला. हेच चित्र बिहारमध्ये दिसत होते. नितिश कुमार हे लोकमान्यता असलेले नेतृत्व आहे. मागील निवडणुकीत नितिश कुमार आणि भाजप एकत्र लढले. परंतु भाजपचे अजून एक वैशिष्ट्य असे आहे की ते निवडणुकीत एकत्र येतात आणि मित्रपक्षाचे लोक कसे कमी निवडून येतील याची काळजी घेतात. हे महाराष्ट्रातही घडले", असा थेट आरोपही शरद पवार यांनी केला.