नुकत्याच झालेल्या ईशान्य भारतातील तीन राज्यांमधील निवडणुकीत भाजपाने लक्षणीय यश मिळवलं होतं. त्यात त्रिपुरात स्वबळावर तर नागालँडमध्ये आघाडी करून भाजपाने विजय मिळवला. नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचेही ७ आमदार निवडून आले आहेत. दरम्यान, नागालँडमध्ये भाजपा-एनडीपीपी आघाडीच्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर या सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय शरद पवार यांच्या पक्षाने घेतला आहे. या निर्णयावर महाराष्ट्रातील विविध स्तरातून टीका होत आहे. दरम्यान, नागालँडमधील भाजपा-एनडीपीपी आघाडीला पाठिंबा का दिला, या मागच्या खऱ्या कारणाचा अखेर शरद पवार यांनी उलगडा केला आहे.
आज नाशिकमध्ये एका कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी याबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे. शरद पवार म्हणाले की, आमच्या सातही आमदारांनी भाजपासोबत जाण्यास विरोध केला होता. पण नागालँडमधील परिस्थिती ही इतर राज्यांपेक्षा वेगळी आहे. इथे कुठलाही पक्ष सत्तेबाहेर राहिलेला नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनानंतर आम्हीही सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याचा अर्थ आम्ही भाजपाला पाठिंबा दिला किंवा भाजपासोबत सत्तेत सहभागी झालो, असा होत नाही, असे शरद पवार म्हणाले.
नागालँडमधील विधानसभेच्या ६० जागांसाठी फेब्रुवारी महिन्यात निवडणूक झाली होती. त्या निवडणुकीत भाजपा-एनडीपीपी आघाडीने ३९ जागा जिंकल्या होत्या.